IND vs WI 2nd Test Day 1 Stumps : युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालनं केलेली विक्रमांची 'बरसात' आणि सातत्याने अपयशी ठरलेला साई सुदर्शनच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीतील पहिला दिवस गाजवला. दिवसाअखेर भारतीय संघाने २ विकेट्सच्या मोबदल्यात ३१८ धावा केल्या. २०२४ पासून घरच्या मैदानात खेळताना पहिल्या दिवशी भारतीय संघाने उभारलेली ही चौथ्या क्रमांकाची धावसंख्या ठरली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी यशस्वी जैस्वाल १७२ धावांवर नाबाद खेळत होता. दुसऱ्या बाजूला कर्णधार शुबमन गिल २० धावांवर खेळत होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
साई सुदर्शन चमकला, पण...
शुबमन गिलनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर ५८ धावांवर लोकेश राहुलच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. अनुभवी सलामीवीरानं ५४ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३८ धावांची खेळी केली. पण त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १९३ धावांची दमदार भागीदारी रचत कॅरेबियन संघाला बॅकफुटवर ढकलले. यशस्वीला उत्तम साथ देताना साई चमकला खरा, पण शतकाची संधी हुकली. साई सुदर्शन याने १६५ चेंडूचा सामना करताना १२ चौकाराच्या मदतीने ८७ धावा केल्या. लोकेश राहुल पाठोपाठ त्याची विकेटही जोमेल वारिकन याने घेतली.
IND vs WI ...अन् 'लक फॅक्टर' गिलच्या कामी आला; पराभवाचा 'सिक्सर' पदरी पडल्यावर अखेर तो जिंकला!
यशस्वी जैस्वालचा मोठा पराक्रम, असा करणारा ठरला पहिला फलंदाज
यशस्वी जैस्वाल याने पहिल्या डावातील पहिल्या दिवसाच्या खेळात नाबाद १७२ धावा केल्या. वयाच्या २३ व्या वर्षी पाचव्यांदा १५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. याआधी कुणालाच अशी कामगिरी जमलेली नाही. दुसऱ्या दिवशी तो द्विशतकी डाव साधण्यासाठी मैदानात उतरेल.
२०२४ पासून टीम इंडियाचा घरच्या मैदानातील कसोटीत पहिल्या दिवसाच्या कामगिरीचा रेकॉर्ड
- ३३६/६ - भारत विरुद्ध, विशाखापट्टणम
- ३२६/५ - भारत विरुद्ध इंग्लंड, राजकोट
- ३३९/६ - भारत विरुद्ध बांगलादेश, चेन्नई
- ४६ सर्वबाद - भारत विरुद्ध न्यूझीलंड, बेंगळुरू
- ३१८/२ - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, दिल्ली *