India vs West Indies 2nd T20I Time Change : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्याच्या वेळेत बदल करण्याचा आश्चर्यकारक निर्णय विंडीज क्रिकेट बोर्डाला घ्यावा लागला. भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज होणाऱ्या दुसऱ्या लढतीची सर्वांना उत्सुकता होती. सुरुवातीला हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून सुरू होणार होता, परंतु त्यात बदल करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
विंडीज बोर्डाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. खेळाडूंचे लगेज ( सामान) अद्याप त्रिनिदाद येथून सेंट किट्सला पोहोचलेले नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. आता हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजता सुरू होणार आहे. विंडीज क्रिकेट बोर्डाने याबद्दल चाहत्यांचे, प्रायोजकांचे, ब्रॉडकास्टर व इतरांची क्षमा मागितली आहे.
अमेरिकेत होणाऱ्या शेवटच्या दोन सामन्यांवर संकट
व्हीसाची समस्या दूर न झाल्यास उर्वरित दोन सामने अमेरिकेत नव्हे तर विंडीजमध्ये होऊ शकतील. वेस्टइंडिज क्रिकेटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "वेस्टइंडिजच्या धरतीवरच शेवटचे दोन सामने खेळवले जाऊ शकतात. मात्र अद्याप व्हिसाची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. यापूर्वी संघ सेंट किट्समध्ये पोहचल्यावर त्यांना अमेरिकेच्या व्हिसाची कागदपत्रे दिली जायची मात्र आता यामध्ये बदल करण्यात आला आहे."