India vs West Indies 2nd T20I Live Marathi : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले होते, परंतु त्यांना पराभव टाळता आला नाही. २ धावा २ विकेटनंतर वेस्ट इंडिजने निकोलस पूरन व रोव्हमन पॉवेल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात चांगले कमबॅक केले होते. भारतीय गोलंदाज हतबल झालेले पाहायला मिळाले, परंतु नशिबाचे चक्र फिरले. पूरनची विकेट पडली अन् भारतीय गोलंदाजाने पुढील ३ धावांत ४ विकेट्स घेत वेस्ट इंडिजला बॅकफूटवर फेकले आणि हातातून निसटलेला सामना खेचून आणला होता. मात्र, १९व्या षटकात सामना फिरला अन् विंडीजने २-० अशी आघाडी घेतली. 12 वर्षानंतर भारतीय संघ द्विदेशीय मालिकेत विंडीजकडून सलग दोन सामन्यांत हरला.
विकेट मिळवण्यासाठी इशान किशन जास्तच 'स्मार्ट' बनायला गेला अन्... Video
हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात ब्रेंडन किंग व जॉन्सन चार्ल्स या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. कायले मायर्स ( १५) व निकोलस पूरन यांनी चांगली फटकेबाजी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु अर्शदीप सिंगने ही जोडी तोडली. रवी बिश्नोईच्या पहिल्याच षटकात निकोलसने ४,६,०,४,४,० अशी फटकेबाजी केली. निकोलस व कर्णधार रोव्हमन पॉवेल ( २१) यांनी ३७ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली. पूरनने भारताची डोकेदुखी वाढवली होती आणि त्यात शिमरोन हेटमायरची भर पडली. मुकेश कुमारने भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. पूरन ४० चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांवर झेलबाद झाला.
अल्झारी जोसेफने दुसराच चेंडू षटकार खेचून सामना ९ चेंडूंत ४ धावा असा आणला. जोसेफने १ धाव घेत अकिल होसेनला स्ट्राईक दिली अन् त्याने २ धावा घेतल्या. होसेनने चौकार खेचून १८.५ षटकांत ८ बाद १५५ धावा करून विंडीजचा विजय निश्चित केला.
तत्पूर्वी, शुबमन गिल ( ९), सूर्यकुमार यादव ( १) आणि संजू सॅमसन ( ७) यांनी आज पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. इशान २३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह २७ धावांवर बाद झाला. तिलकसह त्याने ४२ धावांची भागीदारी केली. तिलकने ३९ चेंडूंत पहिले अर्धशतक पूर्ण केले. तिलकला ५१ धावांवर ( ४१ चेंडू, ५ चौकार व १ षटकार) झेलबाद केले. हार्दिकसह त्याने २७ चेंडूंत ३८ धावा जोडल्या. हार्दिक ( २४ ) आणि अक्षर पटेल ( १४) यांनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. रवी बिश्नोई ( ८) व अर्शदीप सिंग ( ६) यांनी संघाला ७ बाद १५२ धावांपर्यंत पोहोचवले.