India vs West Indies 2nd T20I Live Marathi : २ धावा २ विकेटनंतर वेस्ट इंडिजने निकोलस पूरन व रोव्हमन पॉवेल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात चांगले कमबॅक केले होते, परंतु नशिबाचे चक्र फिरले. पूरनची विकेट पडली अन् भारतीय गोलंदाजाने पुढील ३ धावांत ४ विकेट्स घेत वेस्ट इंडिजला बॅकफूटवर फेकले. तरीही हातातून निसटलेला सामना विंडीजने खेचून आणला आणि २ विकेट्स राखून मॅच जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. या पराभवानंतर हार्दिकने फलंदाजांवर खापर फोडले...
शुबमन गिल ( ९), सूर्यकुमार यादव ( १) आणि संजू सॅमसन ( ७) यांनी आज पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. इशान २३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह २७ धावांवर बाद झाला. तिलकसह त्याने ४२ धावांची भागीदारी केली. तिलकने ३९ चेंडूंत पहिले अर्धशतक पूर्ण केले. तिलकला ५१ धावांवर ( ४१ चेंडू, ५ चौकार व १ षटकार) झेलबाद केले. हार्दिकसह त्याने २७ चेंडूंत ३८ धावा जोडल्या. हार्दिक ( २४ ) आणि अक्षर पटेल ( १४) यांनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. रवी बिश्नोई ( ८) व अर्शदीप सिंग ( ६) यांनी संघाला ७ बाद १५२ धावांपर्यंत पोहोचवले.
हार्दिक पांड्याने भारताला चांगली सुरूवात करून देताना पहिल्या षटकात २ विकेट्स घेतल्या. निकोलस पूरन व रोव्हमन पॉवेल यांनी डाव सावरला आणि ३७ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली. पूरन ४० चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर पुढील ३ धावांत त्यांचे ४ फलंदाज बाद झाले. युझवेंद्र चहलने हेटमायरला ( २२) LBW केले. २४ चेंडू २४ धावा विंडीजला हव्या असताना अकिल होसेन ( १६*) व अल्झारी जोसेफ ( १०*) यांनी किल्ला लढवला अन् १८.५ षटकांत सामना जिंकला. वेस्ट इंडिजकडून द्विदेशीय मालिकेत सलग २ सामने गमावणारा हार्दिक पांड्या भारताचा पहिला कर्णधार ठरला. २०१६नंतर विंडीजने प्रथमच सलग दोन ट्वेंटी-२०त भारताला पराभूत केले.
पराभवानंतर हार्दिक पांड्या फलंदाजांवर भडकला...हार्दिक म्हणाला, आमच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. सातत्याने विकेट पडल्या आणि ही खेळपट्टी संथ होती. आम्ही १७० पर्यंत पोहोचायला हवं होतं. ज्या प्रकारे निकोलस पूरन फलंदाजी करत होता, त्यामुळे आम्हाला फिरकीपटूंचा योग्य वापर करता आला नाही. २ बाद २ धावांवरून ज्याप्रकारे त्यांनी फलंदाजी केली, ते अविश्वसनीय होते. सध्याच्या परिस्थितीत सात फलंदाजासह खेळणे गरजेचे होते. पण, ८, ९ व १०व्या क्रमांकाच्या फलंदाजांपर्यंत ताकद वाढवायला हवी. फलंदाजांनी अधिक जबाबदारीने खेळायला हवं.