फ्लोरिडा, भारत वि. वेस्ट इंडिज : दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर २२ धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू असताना पावसानं व्यत्यय आणल्यानं खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी वेस्ट इंडिजनं १५.३ षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात ९८ धावा केल्या होत्या. पावसानं विश्रांती न घेतल्यानं अखेर डकवर्थ लुईसनुसार भारताला विजयी घोषित करण्यात आलं. या सामन्यासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. फलंदाजीसह गोलंदाजीतही चुणूक दाखवणाऱ्या कृणाल पंड्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माची दे दणादण फलंदाजी पाहायला मिळाली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत रोहितने भाराताल आक्रमक सुरुवात करून दिली. रोहितच्या या दमदार सुरुवातीमुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना 167 धावा करता आल्या. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि धवन यांनी यावेळी ६७ धावांची सलामी करून दिली. धवन यावेळी २३ धावांवर बाद झाला. धवन बाद झाल्यावरही रोहितने आपली धडाकेबाज फलंदाजी कायम ठेवली. रोहितने ५१ चेंडूंत ६ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६७ धावांची खेळी साकारली.
रोहित बाद झाल्यावर विराट कोहलीने भारताचा किल्ला लढवला, पण कोहलीला मोठी खेळी साकारता आली नाही. कोहलीला २८ धावा करता आल्या. कृणाल पंड्याने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला आपली धावसंख्या फुगवता आली. २० षटकांमध्ये भारतानं ५ बाद १६७ धावा केल्या.
वेस्ट इंडिजच्या डावाला सुरुवात होताच भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदरनं शानदार गोलंदाजी करत पहिल्या तीन षटकांमध्ये सलामीवीरांना माघारी धाडलं. यानंतर पूरन आणि पॉवेल यांनी ७६ धावांची भागिदारी केली. मात्र पूरनच्या संथ खेळीमुळे विंडीजला अपेक्षित धावगती राखता आली नाही. पांड्यानं पूरन आणि पॉवेलला बाद करत वेस्ट इंडिजला लागोपाठ दोन धक्के दिले. त्यानंतर पोलार्ड आणि हेटयामर मैदानात असताना पावसाला सुरुवात झाली. अखेर १५.३ षटकांचा खेळ झाला असताना खेळ थांबवण्यात आला.