IND vs WI 1st Test : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी वेस्ट इंडिजने १३ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये कर्क मॅकेन्झी आणि अलिक अथनीज या दोन नव्या चेहऱ्यांची निवड करण्यात आली आहे. अष्टपैलू रहकीम कोर्नवॉल आणि डावखुरा फिरकीपटू जोमेल वॉरिकन यांचे पुनरागमन झाले आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीनंतर कोर्नवॉल प्रथमच वेस्ट इंडिज कसोटी संघात आला आहे. पहिला कसोटी सामना डॉमिनिका येथे होणार आहे. सध्या विंडीजचा संघ अँटिग्वामध्ये प्री सीरीज कॅम्पमध्ये आहे आणि ९ जुलै रोजी डॉमिनिकाला तो रवाना होईल.
मुख्य निवडकर्ते डेसमंड हेन्स यांनी दोन नवीन चेहऱ्यांच्या निवडीबद्दल सांगितले की,''नुकत्याच झालेल्या बांगलादेश अ संघाच्या दौऱ्यात मॅकेन्झी आणि अथनीझ यांनी बॅटने प्रभावित केले होते. या दोन्ही युवा खेळाडूंनी उत्तम धावा केल्या आणि अप्रतिम परिपक्वतेने खेळले. त्याला संधी मिळाली पाहिजे, असे आमचे मत आहे.''
कायले मेयर्स आणि जेडेन सील्स यांना कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. यासंदर्भात मुख्य निवडकर्त्याने सांगितले की, 'शिबिरात सील्स आमच्यासोबत होता आणि शस्त्रक्रियेनंतर त्याने चांगली प्रगती केली आहे. तरीही तो अद्याप पुनरागमनासाठी पूर्णपणे तयार नाही आणि या क्षणी आम्ही त्याच्याबरोबर धोका पत्करू इच्छित नाही. मेयर्सचाही विचार करण्यात आला होता,पण त्याला किरकोळ दुखापत झाली.