India vs West Indies 1st Test Live : भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या सत्रात वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले आहे. आर अश्विनने ( R Ashwin) दोन्ही सलामीवीरांना मागे पाठवून इतिहास रचला. तेच शार्दूल ठाकूर व रवींद्र जडेजा यांच्या गोलंदाजीवर इशान किशन व मोहम्मद सिराज यांनी अफलातून झेल टिपले. वेस्ट इंडिजचे चार फलंदाज उपहारापर्यंत माघारी परतले आहेत.

भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन या डावखुऱ्या फलंदाजांनी आज कसोटीत पदार्पण केलं आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर विंडीजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट आणि तागेनारायण चंद्रपॉल यांनी चांगला खेळ करताना १२ षटकं खेळून काढली. जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज यांना खेळपट्टीची फार मदत मिळत नव्हती. म्हणून रोहितने फिरकीपटू आर अश्विनला गोलंदाजीला आणले अन् त्याने त्याच्या तिसऱ्या षटकात यश मिळवून दिले. चंद्रपॉलला अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत करून १२ धावांवर माघारी पाठवले. विंडीजला ३१ धावांवर पहिला धक्का बसला.
अश्विनच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्याच्या प्रयत्नात ब्रेथवेट २० धावांवर रोहितच्या हाती झेल देऊन माघारी परतला. विंडीजचे दोन्ही सलामीवीर ३८ धावांवर बाद झाले. आर अश्विनने वेस्ट इंडिजच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवल्यानंतर शार्दूल ठाकूरने त्याच्या पहिल्याच षटकात रेयमंड रेइफर ( २) ची विकेट मिळवली, यष्टींमागे इशान किशनने चांगली कॅच घेतली. शार्दूलच्या दुसऱ्या षटकात ब्लॅकवूडला जीवदान मिळाले, शुबमन गिलने झेल टिपण्यासाठी उशीरा झेप घेतली. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर जेरमेन ब्लॅकवूड ( १४) याचा मोहम्मद सिराजने अफलातून झेल टिपला. लंच ब्रेकपर्यंत विंडीजच्या ४ बाद ६८ धावा झाल्या आहेत.