India vs West Indies 1st Test Live : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्लेइंग इलेव्हनबाहेर बसवलेल्या आर अश्विनने आज वेस्ट इंडिजविरुद्ध कमाल करून दाखवली. भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमानांचा पहिला डाव १५० धावांवर गुंडाळला. अश्विनने ( R Ashwin) ५ विकेट्स घेत विक्रमांची रांग लावली, रवींद्र जडेजाने ३ तर मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या. भारताचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला मागील काही काळापासून चांगली कामगिरी करता आली नाही. आजही तो लवकर बाद झालाच असता, परंतु अम्पायरमुळे तो वाचला. (IND vs WI 1st Test Live Scoreboard )
पदार्पणवीर एलिक अथानाझे ( ४७) वगळल्यास वेस्ट इंडिजचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. कर्णधार क्रेग ब्रेथवेट ( २०) आणि तागेनारायण चंद्रपॉल ( १२ ) यांना आर अश्विनने माघारी पाठवले. शार्दूल ठाकूरने त्याच्या पहिल्याच षटकात रेयमंड रेइफर ( २) ची विकेट मिळवली आणि जडेजाने जेरमेन ब्लॅकवूड ( १४) आणि जोशुआ डा सिल्वा ( २) यांना बाद करून विंडीजचा निम्मा संघ ७६ धावांत तंबूत पाठवला. जेसन होल्डर व पदार्पणवीर एलिक अथानाझे यांनी सहाव्या विकेटसाठी १०८ चेंडूंत ४१ धावा जोडल्या. मोहम्मद सिराजने होल्डरला चूक करण्यास भाग पाडले. तो ६१ चेंडूंत १८ धावा करून बाद झाला. अथानाझेचे अर्धशतक ( ४७) थोडक्यात हुकले. विंडीजचा संघ १५० धावांत तंबूत परतला. अश्विनने २४.३-६-६०-५ अशी स्पेल टाकली.
१९६२ नंतर वेस्ट इंडिजमध्ये कसोटीत सलामीला आलेला रोहित हा भारताचा पहिलाच कर्णधार ठरला. तेव्हा नरी काँट्रॅक्टर सलामीला आले होते.