राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : पदार्पणातच पृथ्वी शॉने आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली. केवळ स्थानिक क्रिकेटमध्येच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याने आपला दबदबा राखला. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात 99 चेंडूंत शतक पूर्ण केले. पदार्पणात शतक करणारा तो पंधरावा भारतीय फलंदाज आहे.
त्याने 103 धावांचा पल्ला ओलांडताच मुंबईच्याच प्रविण अमरे यांचा विक्रम मोडला. अमरे यांनी 1992 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणात 103 धावा केल्या होत्या. पदार्पणात पहिल्या डावात शतक करणारा पृथ्वी हा पाचवा भारतीय फलंदाज आहे. या विक्रमात मोहम्मद अझरुद्दीन, हनुमंत सिंग, वीरेंद्र सेहवाग आणि एजी क्रिपाल सिंग यांनी अशी कामगिरी केली आहे. या विक्रमात 110 धावांसह अझरुद्दीन आघाडीवर आहे आणि पृथ्वीला तो विक्रम मोडण्याची संधी आहे.
पदार्पणात शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये 187 धावांसह शिखर धवन आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ रोहित शर्मा ( 177), गुंडप्पा विश्वनाथ ( 137), सौरव गांगुली ( 131), सुरींदर अमरनाथ ( 124), सुरेश रैना ( 120) हे आघाडीवर आहेत.