U19 Asia Cup 2025, IND vs UAE : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने UAE विरुद्धच्या लढतीनं अंडर १९ आशिया कप स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. दुबईच्या आयसीसी अकादमीच्या ग्राउंडवर रंगलेल्या पहिल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार आयुष म्हात्रे ११ चेंडूचा सामना करून एका चौकाराच्या मदतीने ४ धावांची भर घालून माघारी फिरला. अवघ्या ८ धावांवर पहिली विकेट गमावल्यावर वैभव सूर्यवंशीनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. पॉवर प्लेमध्ये त्याने आपल्या फलंदाजीचा खास नजराणा पेश करताना एरॉन जॉर्जच्या साथानं संघाचा डाव सावरला. षटकार मारत त्याने ३० चेंडूत अर्धशतक साजरे केले.
आधी संयम दाखवला, मग सुरु केली फटकेबाजी
नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या जोडीनं भारताच्या डावाची सुरुवात केली. तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर युग शर्मानं आयुष म्हात्रेच्या रुपात युवा भारतीय संघाला पहिला धक्का दिला. दुसऱ्या बाजूला स्फोटक अंदाजात सुरुवात करणारा वैभव सूर्यवंशीनं पहिल्या चार पाच चेंडूवर अगदी संयमी अंदाजात खेळताना दिसला. मग गियर बदलत त्याने आपल्या भात्यातील एक से बढकर एक फटका काढत युएईच्या गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. गियर बदलून त्याने अवघ्या ३० चेंडूत अर्धशतक साजरे केले. अर्धशतकानंतर त्याची फटकेबाजी अधिक आक्रमक झाली असून सलामीच्या लढतीत तो शतकाच्या दिशेनं अगदी वेगाने पुढे जाताना दिसतोय.
दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागादीरी
वैभव सूर्यवंशीनं भारतीय संघाचा डाव सावरताना एरॉन जॉर्ज याच्या साथीनं शतकी भागीदारी रचली. वैभव सूर्यवंशी आक्रमक झाल्यावर जॉर्जनं स्ट्राइक रोटेड करत त्याला अधिकाधिक स्ट्राइक मिळेल, या पद्धतीने खेळ करण्यावर भर दिला. जॉर्ज हा त्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जातो. अंडर १९ मध्ये वैभवसह डावाला आकार देताना त्यानेही आपल्या फलंदाजीतील खास क्षमता दाखवून दिली. ही जोडी जमली आणि दोघांनी शतकी भागीदारीसह भारतीय संघाला मजबूत स्थितीत नेले.