Join us

पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर फॉलोऑनचं संकट, निम्मा संघ माघारी

भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या गॉल कसोटीमध्ये दुसऱ्याच दिवशी टिम इंडियाने आपली पकड घट्ट केली आहे. भारताने दिलेल्या 600 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 13:02 IST

Open in App
ठळक मुद्देदुसऱ्या दिवसाअखेरीस श्रीलंकेची 154/5 अशी दयनीय अवस्था श्रीलंकेच्या संघावर फॉलोऑनचं संकट घोंगावत असून फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना अजूनही 247 धावांची गरजफलंदाजांनी केलेल्या शानदार प्रदर्शनानंतर गोलंदाजांनी भेदक मारा करत लंकेची दाणादाण उडवून दिली

गॉल, दि. 27 - भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या गॉल कसोटीमध्ये दुसऱ्याच दिवशी टिम इंडियाने आपली पकड घट्ट केली आहे. भारताने दिलेल्या 600 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. दुसऱ्या दिवसाअखेरीस श्रीलंकेची 154/5 अशी दयनीय अवस्था झाली आहे.  श्रीलंकेच्या संघावर फॉलोऑनचं संकट घोंगावत असून फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना अजूनही 247 धावांची गरज आहे. 

फलंदाजांनी केलेल्या शानदार प्रदर्शनानंतर गोलंदाजांनी भेदक मारा करत लंकेची दाणादाण उडवून दिली आहे. सध्या श्रीलंकेकडून माजी कर्णधार अँजलो मॅथ्यूज खेळत असून त्याने अर्धशतक झळकावले आहे. तो 54 धावांवर नाबाद आहे. त्याच्यासोबत दिलरुवान परेरा सहा धावांवर खेळत आहे. भारताकडून मोहम्मद शमीनं दोन, तर उमेश यादव आणि रवीचंद्रन अश्विननं प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडून भारताला गॉल कसोटीवर घट्ट पकड मिळवून दिली.  

भारतीय संघाच्या डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेची तीन बाद 68 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर अँजलो मॅथ्यूज आणि उपुल थरंगा या जोडीने चौथ्या विकेटसाठी चांगली भागीदारी रचत श्रीलंकेची धावसंख्या शंभरीपार नेली. अखेर थरंगा धावचीत झाल्यानं  ही जोडी फुटली, त्यानंतर आलेला निरोशन डिकेवाला हा देखील स्वस्तात माघारी परतला.

त्यापुर्वी, कालच्या 3 बाद 399 धावांहून पुढे खेळताना भारताला दुस-या दिवशी फक्त 201 धावाच करता आल्या. गुरुवारी अजिंक्य रहाणे (57), हार्दिक पांडयाची अर्धशतके आणि अश्विनच्या (47) धावा दुस-या दिवशीच्या खेळाचे वैशिष्टय ठरले. श्रीलंकेचा नुवान प्रदीप यशस्वी गोलंदाज ठरला.  त्याने 31 षटकात 132 धावा देत सहा फलंदाजांना माघारी धाडले. गॉल कसोटीचा दुसरा दिवस भारताच्या अष्टपैलू हार्दिक पंड्यानं गाजवला. त्यानं या कसोटीत पदार्पणात अर्धशतक साजरं केलं. पंड्यानं पाच चौकार आणि तीन षटकारांसह 49 चेंडूंत 50 धावांची खेळी केली. 

कसोटीच्या पहिल्या दिवशीही भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व राखले होते. शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा यांनी फटकावलेल्या शतकांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर 3 बाद 399 अशी भक्कम धावसंख्या उभारली होते.