India vs Sri Lanka 1st T20I Live Updates : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. BCCI ने २०२४चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन हार्दिककडे नेतृत्व सोपवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आशियाई विजेत्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात आज शुभमन गिल व शिवम मावी या दोन खेळाडूंचे पदार्पण झाले आहे. पण, या सामन्यापूर्वी फॉर्मात असलेला गोलंदाज आजारी पडला आणि भारताला धक्का बसला.
भारताच्या ट्वेंटी-२० स्क्वाडमध्ये अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. २०२४ च्या वर्ल्ड कप स्पर्धेकडे पाहता त्यांची निवड करण्यात आलीये. शुभमन गिलही यापैकी एक आहे. तो १३ कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळला आहे. परंतु ट्वेंटी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्यानं पदार्पण केलेलं नाही. त्यामुळे गिलला आजच्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली आहे. शिवम मावी याचेही आज पदार्पण होत आहे. २०१८ साली झालेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघातील शिवम मावी व शुभमन गिल हे अनुक्रमे वरिष्ठ संघात ट्वेंटी-२० त पदार्पण करणारे १०० व १०१ वे खेळाडू ठरले.
भारतीय संघाकडून गोलंदाजीची सुरूवात अर्शदीप सिंग करण्याची शक्यता होती. त्याने २१ ट्वेंटी-२० सामन्यांत भारतासाठी ३३ विकेट्स घेतल्या. वर्ल्ड कप स्पर्धेतही त्याची कामगिरी चांगली झाली होती. पण, तो आजारपणातून बरा झाला नसल्याने पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे हार्दिकने स्पष्ट केले. त्यामुळे मावीला संधी मिळाली.
भारतीय संघ - हार्दिक पांड्या, इशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, हर्षल पटेल, शिवम मावी, उम्रान मलिक, युझवेंद्र चहल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"