India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. कर्णधार रोहितने मागील सामन्यात इशानला फलंदाजीतील चूका दाखवल्या होत्या आणि त्यानंतर आज इशानचा खेळ भलताच बहरलेला दिसला. त्यानं अवघ्या ३० चेंडूंत ट्वेंटी-२०तील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. पण, ११व्या षटकात त्याला तातडीची वैद्यकिय मदत घ्यावी लागली.
वेस्ट इंडिजवर निर्भेळ यश मिळवल्यानंतर भारतीय संघ आता श्रीलंकेचा पाहुणचार करणार आहे. लखनौ येथे होणाऱ्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) सहा बदलांसह मैदानावर उतरला आहे. भारतीय संघात आज सहा बदल पाहायला मिळाले. संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह व युझवेंद्र चहल यांचे पुनरागमन झाले, तर दीपक हुडाचे पदार्पण झाले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत ऋतुराजला सलामीला खेळण्याची संधी रोहितने दिली, परंतु ४ धावा करून तो माघारी परतला. त्यानंतर आज तो मनगटाच्या दुखापतीमुळे पुन्हा बाकावर बसला.
इशान किशन आणि रोहित यांनी भारताला दमदार सुरूवात करून दिली. इशान किशन आज तुफान फॉर्मात होता. तो श्रीलंकेच्या गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडला. ७व्या षटकात जेफरी वंदेर्सायच्या गोलंदाजीवर इशानचा फटका चूकला अन् चेंडू हवेत उडाला, परंतु लियानागे हे झेल टिपण्यात चूक केली. इशानला ४३ धावांवर जीवदान मिळाले. इशानने ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याआधी रोहित शर्माने ३८ धावा करून मोठा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान रोहितने पटकावला. त्याने ३३००* धावा करताना मार्टिन गुप्तील ( ३२९९) व विराट कोहली ( ३२९६ ) यांना मागे टाकले. इशान व रोहित या जोडीनं १०.२ षटकांत शतकी भागीदारी पूर्ण केली.
वैद्यकिय उपचार घेतल्यानंतर इशान मैदानावर खेळत राहिला, परंतु १२ व्या षटकात लाहिरू कुमाराने ही भागीदारी तोडली. त्याने रोहित शर्माला ४४ धावांवर त्रिफळाचीत केले. इशान व रोहितने पहिल्या विकेटसाठी १११ धावा जोडल्या.