India Playing XI 1st ODI vs Sri Lanka : बीसीसीआयला साक्षात्कार झाला अन् ६ दिवसांनी जसप्रीत बुमराह वन डे मालिकेतून माघार घेत असल्याचे जाहीर करण्यात आले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाबाहेर गेलेला जसप्रीत श्रीलंका वन डे मालिकेतून पुनरागमन करेल, त्यामुळे चाहते आनंदात होते. पण, ३ जानेवारीला जसप्रीत १०० टक्के तंदुरुस्त झाल्याचे जाहीर करणाऱ्या बीसीसीआयने ९ जानेवारीला तो वन डे मालिकेतून माघार घेत असल्याचे ट्विट केले. रोहित शर्मा, विराट कोहली आदी वरिष्ठ खेळाडूही या मालिकेतून पुनरागमन करणार आहेत. त्यामुळे भारताची ताकद वाढणार आहे. पण, बुमराहच्या माघारीमुळे कर्णधार रोहित शर्माची डोकेदुखी वाढली आहे.
तीन प्रश्नांची उत्तरं...
- रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार?
- सूर्यकुमार यादव की श्रेयस अय्यर ?
- मोहम्मद शमीसह गोलंदाजीची धुरा कोण सांभाळणार?
BCCI चा यू टर्न! ६ दिवसांपूर्वी १०० टक्के फिट असलेल्या जसप्रीत बुमराहची मालिकेतून माघार
या मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात शिखर धवनला स्थान देण्यात आलेले नाही. इशान किशन व शुभमन गिल हे दोन फलंदाज रोहित शर्मासह सलामीसाठी शर्यतीत आहेत. संघ व्यवस्थापनाने लोकेश राहुलवर यष्टिरक्षण व चौथ्या क्रमांकावर फलंदाजी अशी नवीन जबाबदारी दिली आहे. पण, इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवल्यानंतर यष्टींमागे कोण दिसेल, याची उत्सुकता आहे.
जसप्रीत बुमराहच्या माघारीमुळे मोहम्मद शमी याच्याकडे जलदगती गोलंदाजांचे नेतृत्व असेल. भारत उद्याच्या सामन्यात तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरेल. हार्दिक पांड्या हा चौथा जलदगती गोलंदाजाचा पर्याय संघाकडे आहे. उर्वरित दोन जागांसाठी मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग व उम्रान मलिक यांच्यात स्पर्धी असेल.
भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उम्रान मलिक, अर्शदीप सिंग
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"