भारतीय संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पाचवा आणि अखेरचा सामना जिंकून मालिका ३-१ अशी खिशात घातली. या सामन्यात शुभमन गिलच्या दुखापतीमुळे अखेर संजू सॅमसनला पुन्हा एकदा सलामीवीराच्या रुपात संधी मिळाली. या संधीचं सोन करताना संजू सॅमसन याने अभिषेकच्या साथीनं संघाला जबरदस्त सुरुवात करुन दिली. त्याने क्लास खेळीसह सलामीच्या रुपात सर्वोत्तम पर्याय असल्याचे सिद्ध केले. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात संजूच्या फलंदाजीचं कौतुक करताना भारताचे माजी कोच आणि विद्यमान समालोचक रवी शास्त्री यांनी LIVE कॉमेंट्रीदरम्यान BCCI निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीर यांना टोला लगावल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला टोला
भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान रवी शास्त्री इंग्लिश कॉमेंट्री पॅनलचा भाग आहेत. पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यातील पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर संजू सॅमसन याने यान्सेनच्या चेंडूवर एक सुरेख फटका मारत चेंडू सीमारेषेपलिकडे धाडला. त्याच्या या फटक्याचं विश्लेषण करताना शास्त्रींनी नाव न घेता अप्रत्यक्षरित्या त्याला संघाबाहेर ठेवणाऱ्या अजित आगरकर आणि गंभीरवर निशाणा साधला.
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअॅक्शन चर्चेत
सलामीवीराच्या रुपात संजूला पहिली पसंती का दिली जात नाही?
शास्त्री म्हणाले की, भारतीय संघात संजू सॅमसनला सलामीवीराच्या रुपात पहिली पसंती का दिली जात नाही? तो नैसर्गिकरित्या या क्रमांकावर खेळण्यास सर्वोत्तम पर्याय आहे. त्याने टी-२० मध्ये ३ शतके झळकाली आहेत. यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने सलग दोन शतके झळकावल्याचा रेकॉर्डही आहे. त्यामुळे दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी त्याला संधी मिळते याचं आश्चर्य वाटते, अशा आशयाचे वक्तव्य करत शास्त्रींनी नाव न घेता गिलच्या जागी संजूच सर्वोत्तम असल्याचे बोलून दाखवले. कॉमेंट्री दरम्यान शास्त्रींनी केलेली कमेंट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
आता तरी संघ व्यवस्थापन गिलचा नाद सोडून संजूला पहिली पसंती देणार का?
भारतीय संघ व्यवस्थापनाकडून शुभमन गिलला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळवण्यावर भर दिला जात आहे. आशिया कप टी-२० स्पर्धेसाठी गिल संघात आल्यावर संजूच्या जागी त्याला सलामीवीराच्या रुपात पहिली पसंती देण्यात आली. गिलनं टेस्टमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली असली तरी टी-२० मध्ये तो धावांसाठी संघर्ष करताना दिसला. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी संजूला सलामीवीराच्या रुपात खेळवणार की शुभमन गिलवरच भरवसा दाखवणार असा प्रश्नही कर्णधार सूर्यकुमार यादवला विचारण्यात आला होता. यावेळी सूर्यानं संजू चांगली कामगिरी करतोय पण गिलला पहिली पसंती मिळेल, हे स्पष्ट केले. विकेट किपर बॅटरच्या रुपात जितेशला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिल्यामुळे संजू पहिल्या तिन्ही सामन्याला बाकावर बसल्याचे पाहायला मिळाले. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ निवडी आधी पुन्हा सलामीला संधी मिळताच त्याने आपल्यातील धमक दाखवून दिली. आता तरी संघ व्यवस्थापन गिलचा नाद सोडून संजूवर भरवसा दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.