Join us  

IND Vs SA: भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला धोका नाही! निर्धारित वेळापत्रकानुसार होणार सामने, बीसीसीआयने दिली माहिती

Corona Virus: भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसारच होईल, असे BCCI कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी मंगळवारी स्पष्ट केले. कोरोनाचा नवा विषाणू Omicronमुळे परिस्थिती खराब व्हायला नको,असेही ते म्हणाले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 8:56 AM

Open in App

नवी दिल्ली : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसारच होईल, असे बीसीसीआय कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी मंगळवारी स्पष्ट केले. कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनमुळे परिस्थिती खराब व्हायला नको,असेही ते म्हणाले. 

भारतीय संघ ३ डिसेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध दुसरी कसोटी खेळल्यानंतर ८ किंवा ९ डिसेंबर रोजी जोहान्सबर्गकडे चार्टर्ड विमानाने रवाना होईल.  द. आफ्रिकेत सुरक्षित बायोबबलमध्ये आमच्या खेळाडूंचे वास्तव्य असेल,अशी ग्वाही देखील धुमल यांनी खेळाडूंना दिली. भारत-द. आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथे पहिली कसोटी १७ डिसेंबरपासून रंगणार आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना धुमल म्हणाले,‘ क्रिकेट दक्षिण आफ्रिका धोकादायक विषाणूविरुद्ध लढा देत असताना आम्ही त्यांच्यासोबत  आहोत. दुसरीकडे खेळाडूंच्या सुरक्षेशी देखील कुठलाही समझोता होणार नाही. सध्यातरी वेळापत्रकानुसारच आम्ही जोहान्सबर्गकडे चार्टर्ड विमानाने संघ पाठविणार आहोत. खेळाडू तेथे बायोबबलमध्ये वास्तव्य करतील.’

धोका टाळण्यासाठी द. आफ्रिकेत संभाव्य स्थानांमध्ये बदल शक्य असेल का, असे विचारताच धुमल म्हणाले,‘ आम्ही सतत क्रिकेट द. आफ्रिका अधिकाऱ्याच्या संपर्कात आहोत.  मालिका रद्द होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्यास आमच्या खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षेशी कुठलीही तडजोड केली जाणार नाही. भारत सरकारच्या सूचनेनुसारच पुढे पाऊल टाकले जाईल,’ असे धुमल यांनी सांगितले. जगातील अनेक देशांनी कठोर पावले उचलत द. आफ्रिका प्रवासावर निर्बंध घातले. मात्र भारताने अद्याप असे केलेले नाही. 

भारत सरकारच्या नव्या निर्देशानुसार द. आफ्रिका ‘जोखिम’ असलेल्या देशांच्या यादीत आहे.  भारतीय अ संघ द. आफ्रिकेत खेळत आहे. त्यामुळे सध्यातरी काळजी करण्याचे कारण नाही, असे बीसीसीआयला वाटते.

टीम इंडियाला सुरक्षित ‘बायोबबल ’ देऊ ! क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने दिले आश्वासनजोहान्सबर्ग : भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात येथे दौऱ्यावर येईल त्यावेळी खेळाडूंना पूर्णपणे सुरक्षित बायोबबल प्रदान करण्यात येईल,अशी ग्वाही दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने बीसीसीआयला दिले आहे.  याशिवाय कोरोनाचा विषाणू आढळल्यानंतरही भारतीय अ संघाला माघारी न बोलविल्याबद्दल आभारही मानले आहेत. भारतीय अ संघांची ब्लोमफौंटेन येथे यजमान संघाविरुद्ध आजपासून दुसरी कसोटी सुरू झाली. नवा विषाणू मिळाल्यानंतरही बीसीसीआयने ही मालिका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  द. आफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, आम्ही भारतीय संघाच्या आरोग्य आणि सुरक्षेची काळजी घेण्यासाठी सर्वतोपरी उपाय करणार आहोत.  द. आफ्रिका आणि भारत अ संघ शिवाय दोन्ही देशांच्या मुख्य राष्ट्रीय संघासाठी सुरक्षित बायोबबल तयार केले जाईल. अ संघाचा दौरा सुरू ठेवण्याच्या बीसीसीआयचे निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. ’

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाबीसीसीआयकोरोना वायरस बातम्याओमायक्रॉन
Open in App