रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या अडचणीत भर पडली आहे. रांची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विचित्र कृती केल्यामुळे आयसीसीने त्याला कडक शिक्षा सुनावली आहे. शिवाय, त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट जोडला गेला आहे.
आयसीसीच्या नव्या नियमांनुसार, हर्षित राणाने आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल १ उल्लंघन केले. त्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला. तसेच त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट जोडला गेला आहे. आयसीसीने म्हटले आहे की दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसची विकेट घेतल्यानंतर हर्षितने आक्रमकपणे उत्सव साजरा केला, जो प्रतिस्पर्धी खेळाडूला चिथावणी देणारा मानला जात होता. पंचाच्या मते, राणाची कृती आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे आढळले. त्याच्यावर मॅच फीच्या ५० टक्के दंड आणि खात्यात एक डिमेरिट पॉईंट जोडण्यात आला
गेल्या २४ महिन्यांतील हा हर्षितचा पहिलाच गुन्हा आहे आणि त्याने सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी सुचवलेली शिक्षा मान्य केले. त्यामुळे, पुढील कारवाईची गरज भासली नाही. फील्ड पंच जयरामन मदनगोपाल आणि सॅम नोगाज्स्की, थर्ड अंपायर रॉड टकर आणि फोर्थ अंपायर रोहन पंडित यांनी हर्षित राणाविरुद्ध आरोप लावले. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने १७ धावांनी विजय मिळवत २-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात हर्षित राणाने १० षटकांत ६५ धावा देऊन तीन फलंदाज आउट केले.