Join us  

IND vs SA : फाफ डु प्लेसिसची शतकी खेळी, भारतासमोर 270 धावांचे आव्हान

 द.आफ्रिका आणि भारत यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाला 270 धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात द. आफ्रिकेने कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर आठ बाद 269 धावा केल्या आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2018 8:20 PM

Open in App

दरबन -  द.आफ्रिका आणि भारत यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाला 270 धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात द. आफ्रिकेने कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर 50 षटकांत आठ बाद 269 धावा केल्या आहेत. विपरीत परिस्थितीत संयम आणि धैर्याचा शानदार परिचय देत तिसरी कसोटी जिंकणारा भारतीय संघ द. आफ्रिकेविरुद्ध आजपासून सुरू होत असलेल्या सहा सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान संघाला नमवित धडा शिकविण्याच्या निर्धारासह मैदानात उतरला आहे. आजच्या सामन्यात द.आफ्रिकेच्या संघाकडून भारताला 270 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. या सामन्यात द. आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. मात्र, फलंदाज हाशिम अमला या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि क्विंटन डी कॉक याने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. फाफ डु प्लेसिसने शानदार शतकी खेळी केली. फाफ डु प्लेसिसने 11 चौकार आणि दोन षटकार लगावत 111 चेंडूत 120 धावा केल्या. हाशिम अमलाने 17 चेंडूत 16 धावा केल्या तर क्विंटन डी कॉकने 34 धावा केल्या. जेपी ड्यूमिनी (12), एडेन मार्कराम (9), डेव्हिड मिलर (7), ख्रिस मॉरिस (37), रबाडा (1) आणि एंडिल फॅलुकवायो याने नाबाद 27 धावा केल्या. भारताकडून गोलंदाज कुलदीप यादवने सर्वाधिक जास्त बळी टिपले. त्याने तीन बळी घेतले तर युजवेंद्र चहलने दोन आणि जसप्रित बुमराह व भुवनेश्वर कुमारने एक बळी टिपला. 

धोनीला १० हजार धावांचा पल्ला गाठण्याची संधीदक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होत असलेल्या मालिकेद्वारे भारताचा स्टार महेंद्रसिंग धोनी याला दोन विक्रम करण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा जादुई आकडा पार करण्यासाठी धोनीला केवळ १०२ धावांची आवश्यकता आहे. त्याचवेळी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४०० बळी पूर्ण करण्यासाठीही त्याला केवळ २ बळींची आवश्यकता आहे. धोनीने आतापर्यंत ३१२ सामने खेळताना २६८ डावांमध्ये ५१.५५च्या शानदार सरासरीने ९,८९८ धावा काढल्या आहेत.भारताकडून याआधी सचिन तेंडुलकर (१८,४२६), सौरभ गांगुली (११,३६३) आणि राहुल द्रविड (१०,८८९) यांनी दहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. त्याचप्रमाणे यष्टीरक्षणामध्ये धोनीने एकूण २९३ झेल घेताना विक्रमी १०५ यष्टीचीत करताना एकूण ३९८ बळी घेतले आहेत. सर्वाधिक बळी मिळवण्याच्या क्रमवारीत श्रीलंकेचा माजी दिग्गज यष्टीरक्षक कुमार संगाकारा (४७२) आघाडीवर असून त्यानंतर आॅस्ट्रेलियाचा अ‍ॅडम गिलख्रिस्ट (४७२) आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर (४२४) यांचा क्रमांक आहे. यानंतर धोनीचा क्रमांक आहे.त्याचवेळी, कर्णधार विराट कोहलीलाही एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० षटकार ठोकण्याची कामगिरी करण्याची संधी आहे. यासाठी कोहली केवळ २ षटकारांनी मागे आहे. त्याने आतापर्यंत २०२ सामन्यांत ९८ षटकार ठोकले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण ३२ फलंदाजांनी षटकाराचे शतक ठोकले असून त्यामध्ये ७ भारतीयांचा समावेश आहे. यामध्ये धोनी (२१६), सचिन तेंडुलकर (१९२), सौरभ गांगुली (१९०), रोहित शर्मा (१६३), युवराज सिंग (१५५), विरेंद्र सेहवाग (१३५) आणि सुरेश रैना (१२०) यांचा समावेश आहे.

भारताचे रेकॉर्ड चांगले नाहीच...भारताला द. आफ्रिकेत याआधी झालेल्या चार द्विपक्षीय वन-डे मालिका जिंकण्यात अपयश आले. याशिवाय संघ येथे दोनदा तिरंगी मालिकाही खेळला. पण दोन्ही वेळा विजेता ठरला तो द. आफ्रिकाच. भारतीय संघ येथे २८ सामने खेळला असून, त्यापैकी केवळ पाच सामने जिंकला. २१ सामन्यांत पराभवाचे तोंड पाहावे लागले. सध्याचा भारतीय संघ हे रेकॉर्ड सुधारण्यास आतूर आहे.पहिला सामना ज्या दरबन शहरात होत आहे, तेथे भारताचे रेकॉर्ड चांगले नाही. १९९२-९३ पासून संघाने येथे जे सात सामने खेळले, त्यापैकी सहा गमविले. एका सामन्याचा निकाल लागला नव्हता. सन २००३च्या विश्वचषकादरम्यान भारताने येथे इंग्लंड आणि केनियाचा पराभव केला. भारताने ही मालिका ४-२ ने जिंकल्यास द. आफ्रिकेकडून अव्वल स्थान हिसकावू शकतो. भारतीय संघ २०१६मध्ये आॅस्ट्रेलियाकडून १-४ ने पराभूत झाल्यानंतर आतापर्यंत द्विपक्षीय मालिकेत ३२पैकी २४ सामने जिंकला आहे. गतवर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मात्र भारत पाककडून पराभूत झाला होता.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८क्रिकेट