Join us  

India vs South Africa 3rd Test: 'टीम इंडिया'च्या प्लेईंग XI बद्दल महत्त्वाची अपडेट! केपटाऊन टेस्टमध्ये २ मोठे बदल होण्याची शक्यता

संघातील एक बदल मधल्या फळीत तर दुसरा बदल गोलंदाजांच्या ताफ्यात केला जाण्याची चर्चा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 11:18 AM

Open in App

भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसरी कसोटी जिंकत मालिका बरोबरीत आणली. आता केपटाउनला होणारी तिसरी कसोटी ही निर्णायक कसोटी असणार आहे. भारताने आतापर्यंत आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे यंदा हा इतिहास बदलण्याच्या उद्देशानेच भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. या सामन्यात कोण कोणावर भारी पडेल, हे तर मैदानावरच समजू शकेल. पण त्याआधी टीम इंडियाच्या प्लेईंग XI बद्दल एक महत्त्वाची अपडेट मिळाली आहे.

केपटाउनच्या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल होण्याची चिन्हं दिसत आहेत. हे बदल संघाच्या मधल्या फळीत आणि गोलंदाजांच्या ताफ्याशी संबंधित असतील. संघाच्या या दोन्ही बदलांमागचं मूळ कारण म्हणजे दुखापत. दुखापतीच्या कारणास्तव एक खेळाडू तंदुरूस्त होऊन संघात परतेल तर एक खेळाडू संघातून बाहेर जाईल.

टीम इंडियाच्या प्लेईंग XI मध्ये दोन बदल?

टीम इंडियाच्या शेवटच्या सामन्यातील प्लेईंग XI मध्ये दोन बदल केले जाण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. अद्याप याबद्दल कोणीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण दुखापतींची पार्श्वभूमी पाहता हे बदल अपेक्षित असतील. पहिला बदल म्हणजे पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरून भारतीय कर्णधार विराट कोहली संघात परतणं जवळपास निश्चित आहे. विराट संघात आल्यास हनुमा विहारीला आपली संघातील जागा गमावायला लागू शकते. दुसऱ्या कसोटीत तो विराटच्या जागी संघात आला होता. तसेच, पुजारा आणि रहाणे यांनी दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केल्याने त्यांच्या जागा जाणं कठीण आहे.

टीम इंडियात प्लेईंग XI मध्ये दुसरा बदल हा गोलंदाजांच्या ताफ्यात होण्याची शक्यता आहे. भारताचा वेगवान अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा हा मोहम्मद सिराजच्या जागी संघात स्थान मिळवू शकतो. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात सिराजला गोलंदाजी करताना दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला फारशी गोलंदाजीही करणं जमलं नव्हतं. केपटाउन कसोटीसाठीही तो कितपत तंदुरूस्त राहिला याची शंकाच आहे. अशा परिस्थितीत शंभरहून अधिक कसोटी सामने आणि ३००पेक्षा जास्त बळी नावावर असणाऱ्या इशांत संघात स्थान दिलं जाऊ शकतं. इशांतचा दांडगा अनुभव केपटाउनच्या पिचवर आफ्रिकेचे बळी टिपण्यात नक्कीच कामी येऊ शकतो.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाइशांत शर्मामोहम्मद सिराजविराट कोहली
Open in App