Join us  

कसोटी क्रिकेटमधील १९३२ सालचा विक्रम तुटला; भारत-दक्षिण आफ्रिका सामना सर्वात 'छोटा' ठरला

IND vs SA 2nd Test  (Marathi News) : भारतीय संघाने केप टाऊन कसोटी दीड दिवसांत जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 5:26 PM

Open in App

IND vs SA 2nd Test   (Marathi News) : भारतीय संघाने केप टाऊन कसोटी दीड दिवसांत जिंकली. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी ठेवलेले ७९ धावांचे लक्ष्य भारताने ७ विकेट्स राखून पार केले आणि मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. महेंद्रसिंग धोनीनंतर दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकात १-१ अशी बरोबरीत सोडवणारा रोहित शर्मा हा भारताचा दुसरा कर्णधार ठरला. पण, केप टाऊनमध्ये कसोटी जिंकणारा तो पहिला आशियाई कर्णधार ठरला. 

मोहम्मद सिराज ( १५-६) व जसप्रीत बुमराह ( ६-६१) यांनी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या डावात उल्लेखनीय मारा करून विजयाचा पाया रचला. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आणि दुसरा डाव १७८ धावांवर भारतीय गोलंदाजांनी गुंडाळला. दुसऱ्या डावात त्याच्यांकडून एडन मार्करमने शतकी खेळी केली. भारताकडून पहिल्या डावात रोहित शर्मा ( ३९), शुबमन गिल ( ३६) व विराट कोहली ( ४६) वगळल्यास अन्य फलंदाज अपयशी ठरले. भारताचा पहिला डाव १५३ असा गडगडला आणि ९८ धावांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. भारताकडून दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल ( २८), विराट कोहली ( १२), शुबमन गिल ( १०) व रोहित शर्मा ( नाबाद १७) यांनी हातभार लावला. 

भारताने १२ षटकांत ३ बाद ८० धावा करून विजय मिळवला. १९३६ नंतर दक्षिण आफ्रिकेत दोन दिवसांत कसोटी संपण्याची ही तिसरी वेळ आहे. २००५ मध्ये आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे ( केप टाऊन) आणि २०१७ मध्ये आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे ( गॅबेरा) कसोटी दोन दिवसांत संपली होती. भारताने केप टाऊन येथे दोन दिवसांत विजय मिळवून इतिहास रचला. यापूर्वी बंगळुरू ( वि. अफगाणिस्तान, १४-१५ जून २०१८) आणि अहमदाबाद ( वि. इंग्लंड, २४-२५ फेब्रुवारी २०२१) येथे दोन दिवसांत कसोटी जिंकली होती.  पण, कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात छोटी मॅच ( चेंडूच्या बाबतीत) ठरली. भारत-दक्षिण आफ्रिका कसोटीचा निकाल ६४२ चेंडूंत लागला आणि १९३२ सालचा ( ऑस्ट्रेलिया वि. आफ्रिका, मेलबर्न) ६५६ चेंडूंचा विक्रम मोडला गेला.  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्मा