Join us  

Venkatesh Iyer, IND vs SA, 1st ODI : वेंकटेश अय्यरनं गोलंदाजी का केली नाही? शिखर धवननं दिलं स्पष्टिकरण, म्हणाला, आम्हाला त्याची गरज वाटली नाही

भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात वेंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer) याला सहावा गोलंदाज म्हणून पदार्पणाची संधी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 11:02 AM

Open in App

IND vs SA, 1st ODI : Why Venkatesh Iyer didn't bowl a single over? - भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात वेंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer) याला सहावा गोलंदाज म्हणून पदार्पणाची संधी दिली. सूर्यकुमार यादवला त्यासाठी प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर बसवले गेले, परंतु वेंकटेशला छाप सोडता आली नाही. तो केवळ २ धावा करून माघारी पर तला, परंतु त्यानं एकही षटक न फेकल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. भारताचा सलामीवीर शिखर धवन ( Shikhar Dhawan) यानं वेंकटेशला गोलंदाजी न देण्यामागचं कारण सांगितलं.  

इंडियन प्रीमिअर लीगच्या मागील पर्वात कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणारा वेंकटेश चर्चेत आला. त्यानंतर त्याला भारताच्या ट्वेंटी-२० संघात खेळण्याची संधी मिळाली आणि काल त्यानं वन डे संघात पदार्पण केलं. प्रमुख गोलंदाज विकेट घेण्यात अपयशी ठरत असताना वेंकटेश गोलंदाजी करेल, याची चाहते वाट पाहत होते. पण, कर्णधार लोकेश राहुलनं प्रमुख पाच गोलंदाजांकडूनच ५० षटकं फेकून घेतली. मग सहावा गोलंदाज का खेळवला,  असा सवाल विचारण्यात आला.  

''आमचे फिरकीपटू चांगली कामगिरी करत होते, त्यामुळे वेंकटेशनं गोलंदाजी करावी अशी गरज आम्हाला वाटली नाही. खेळपट्टीवर चेंडू चांगला वळत होता. जलदगती गोलंदाजांचा अनेकदा अखेरच्या षटकांत वापर होतो. मधल्या षटकांत जेव्हा आम्हाला विकेट घेण्यात अपयश येत होतं, तेव्हा आम्ही प्रमुख गोलंदाजांना परत बोलवण्याचा विचार केला, परंतु त्यातही आम्हाला यश आलं नाही. मग त्यानंतर अखेरच्या षटकांत पुन्हा प्रमुख गोलंदाजांकडून गोलंदाजी करून घेतली.'' 

भारताकडून जसप्रीत बुमराहनं १० षटकांत ४८ धावांत २ विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमारनं १० षटकांत ६४ धावा, शार्दूल ठाकूरनं १० षटकांत ७२ धावा आणि युजवेंद्र चहलनं ५३ धावा दिल्या. आर अश्विननं ५३ धावा देताना १ विकेट घेतली. या सामन्यात शिखर धवननं सर्वाधिक ७९ धावा केल्या. विराट कोहली व शार्दूल ठाकूर यांनी अर्धशतकी खेळी केली, परंतु २९६ धावांच्या पाठलाग करताना भारताला २६५ धावाच करता आल्या. मधल्या फळीतील फलंदाजांनी शरणागती पत्करली.  

धवननं युवा खेळाडूंना काही महत्त्वाचे मार्गदर्शन केले. तो म्हणाला,''परिस्थितीनुसार तुम्हाला खेळता आले पाहीजे. नेहमी संघाला प्राधान्य दिले पाहिजे. तुमची वैयक्तिक कामगिरी महत्त्वाची आहे, परंतु त्याचवेळी संघासाठी आपल्या खेळीत कसा बदल करावा याचाही विचार करायला हवा. संघाला भागीदारीची गरज असताना, तुम्हाला तसा खेळ करता आले पाहीजे. हे अनुभवातून तुम्ही शिकाल.''  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशिखर धवन
Open in App