दुबई, आशिया चषक 2018 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला दुसऱ्या सामन्यातही धुळ चारली. भारताने रविवारी पाकिस्तानवर 9 विकेट आणि 63 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, या पराभवामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचे मनोबल चांगलेच खचले आहे. संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी रविवारचा पराभव हा आत्तापर्यंतचा लाजीरवाणा पराभव असल्याचे मत व्यक्त केले. तसेच संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये अपयशी होण्याची भिती पसरली असल्याचेही ते म्हणाले.
![]()
ते पुढे म्हणाले,''नऊ विकेटने पराभव, हा लाजीरवाणाच पराभव म्हणावा लागेल. भारताकडे चांगल्या खेळाडूंची फौज आहे. त्यांना थोडीशीही संधी दिल्यास त्याचा भुर्दंड सहन करावा लागू शकतो आणि रविवारी हेच झाले.'' पाकिस्तानने भारताला 238 धावांचे लक्ष्य दिले होते आणि रोहित शर्मा व शिखर धवन यांनी वैयक्तिक शतकी खेळी करून भारताला 39.3 षटकांत विजय मिळवून दिला.
आर्थर यांनी सांगितले की,''फलंदाजीत आमचा स्ट्राईक रेट चांगला नव्हता. गोलंदाजांबद्दल सांगायचे तर आम्हाला सुरूवातीला विकेट घ्यायला हव्या होत्या. आम्हाला एक-दोन संधी मिळाल्या, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही. प्रतिस्पर्धी फलंदाजांना अशी संधी दिल्यास ते आपल्यावर दबाव बनवण्यात यशस्वी होतील. भारताविरुद्धही तेच झाले.''