India Set Target Of 176 Runs T20 World Cup 2026 Clash Against Pakistan : ईशान किशनच्या धमाकेदार अर्धशतकी खेळीनं शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ७ बाद १७५ झाला तकच पाकिस्तानसमोर १७६ धावांचे टार्गेट सेट केले आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळे या धावांचा पाठलाग करणं पाकिस्तानसाठी सोपे नसेल. धावांचा बचाव करण्यासाठी वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.
नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजीची वेळ आल्यावर अभिषेक शर्मा आणि ईशान किशन या जोडीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. पहिल्याच षटकात पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगानं अभिषेक शर्माला खातेही उघडू न देता तंबूचा रस्ता दाखवला, पण त्यानंतर ईशान किशन याने तिलक वर्माच्या साथीनं ४६ चेंडूत ८७ धावांची दमदार भागीदारी करत पाकिस्तानच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. ईशान किशन ४० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ७७ धावा करून बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मानं संयमी खेळी करत भारताची धावसंख्या हलवती ठेवली. या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी ३४ चेंडूत ३८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. तिलक वर्मा२४ चेंडूत २५ धावा करून परतल्यावर हार्दिक पांड्या खातेही न उघडता माघारी फिरला. पण त्यानंतर कर्णधार सूर्या आणि शिवम दुबेनं २६ चेंडूत ३३ धावांची भागीदारी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेणारी आश्वासक कामगिरी केली. सूर्यकुमार यादवनं २९ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २९ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. शिवम दुबेनं १७ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. अखेरच्या षटकात रिंकून ४ चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ११ धावांची नाबाद खेळी करत संघाच्या धावफलकावर ७ बाद १७५ धावा लावल्या.
पाकिस्तानच्या संघाकडून सईम अयूब याने ४ षटकात २५ धावा खर्च करत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी आणि उस्मान तारिक यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.