IND vs NZ 3rd ODI, Virat Kohli Break Virender Sehwag Ricky Ponting Record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यावर विराट कोहली पुन्हा एकदा टीम इंडियासाठी मैदानात तग धरून उभा राहिला. ३३८ धावांचा पाठलाग करताना त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील ५४ वे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ८५ व्या शतकाला गवसणी घातली. या शतकासह त्याने भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगचा विक्रम मोडीत काढला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एका डावात किंग कोहलीनं दिली सेहवाग- पाँटिंगला धोबीपछाड
इंदूरच्या मैदानात विराट कोहलीनं याआधी ४ वनडे सामने खेळले होते. पण एकाही सामन्यात त्याला अर्धशतकही करता आले नव्हते. तिसऱ्या वनडेत त्याने आधी हा दुष्काळ संपवला. मग विराट कोहलीने नव्या वर्षातील पहिले अन् न्यूझीलंडविरुद्धचे विक्रमी शतक झळकावले. न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके झळकवण्याच्या बाबतीत तो आता अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. एका डावात त्याने सेहवाग आणि पाँटिंगला धोबीपछाड दिली. या दोघांनी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत प्रत्येकी ६-६ शतके झळकावल्याचा विक्रम आहे.
IND vs NZ : कोहलीनं पेश केला खास नजराणा; इंदूरच्या मैदानातील 'विराट' दुष्काळ संपला, अन्...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतकांचा विक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारात मिळून न्यूझीलंडविरुद्ध त्याच्या बॅटमधून निघालेले हे १० शतक ठरले. सर्व प्रकारात या संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या यादीत त्याने जॅक कॅलिसला मागे टाकले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ऑलराउंडरनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध ७६ डावात ९ शतके झळकावली होती. याशिवाय जो रुटनं ७१ डावात ९ तर सचिन तेंडुलकरने ८० डावात ९ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे. या तीन दिग्गजांना मागे टाकत विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतकांचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
सर्वाधिक मैदानात शतके झळकवण्याचाही साधला डाव
शतकी खेळीसह इंदूरच्या मैदानात पहिले शतक झळकवताना विराट कोहलीनं वेगवेगळ्या ३५ मैदानात शतक झळकावण्याचा खास विश्वविक्रमालाही गवसणी घातली आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे होता. तेंडुलकरनं ३४ वेगवेगळ्या मैदानात शतकी धमाका केला आहे. इंदूरच्या मैदानात कोहलीनं एक नवा इतिहास रचताना विक्रमादित्य सचिन तेंडुलकरलाही मागे टाकल्याचे पाहायला मिळाले.
Web Summary : Virat Kohli scored a record-breaking century against New Zealand in the third ODI, surpassing Virender Sehwag and Ricky Ponting's records. Kohli's impressive innings helped India chase down a target of 338, marking his 54th ODI century and 85th in international cricket.
Web Summary : विराट कोहली ने तीसरे वनडे में न्यूजीलैंड के खिलाफ रिकॉर्ड तोड़ शतक बनाया, वीरेंद्र सहवाग और रिकी पोंटिंग के रिकॉर्ड को तोड़ा। कोहली की शानदार पारी ने भारत को 338 रनों का लक्ष्य हासिल करने में मदद की, यह उनका 54वां वनडे और अंतरराष्ट्रीय क्रिकेट में 85वां शतक है।