IND vs NZ 1st Test Match Live | बंगळुरू : पहिल्या डावातील खराब कामगिरीनंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने चमक दाखवली. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पहिला डाव म्हणजे भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट स्वप्नच... टीम इंडिया अवघ्या ४६ धावांत गारद झाल्याने सगळेच अवाक् झाले. बांगलादेशला कसोटी मालिकेत २-० ने पराभूत करणाऱ्या टीम इंडियासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. सलामीचा सामना बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या ४६ धावांत गडगडली. मग न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात ४०२ धावा करुन यजमानांची कोंडी केली. मात्र, दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी साजेशी खेळी केली. त्यात सर्फराज खान आणि रिषभ पंत यांच्या अप्रतिम खेळीमुळे भारतीय चाहत्यांना सुखद धक्का बसला. विशेष बाब म्हणजे रिषभ पंत शतकाला एक धाव कमी असताना बाद झाला.
दरम्यान, रिषभ पंतने ८७व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर गगनचुंबी षटकार लगावला. न्यूझीलंडचा प्रमुख गोलंदाज टीम साउदीच्या गोलंदाजीवर पंतने मारलेला षटकार तब्बल १०७ मीटर दूर गेला. पंतचा हा अद्भुत फटका पाहून ग्लेन फिलिप्सदेखील अवाक् झाला. भारताच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल (३५), रोहित शर्मा (५२), विराट कोहली (७०), सर्फराज खान (१५०) आणि रिषभ पंतने (९९) धावा केल्या. ९० षटकांपर्यंत भारताने ५ बाद ४३८ धावा करुन ८२ धावांची आघाडी घेतली.
भारताचा पहिला डाव
भारताला आपल्या पहिल्या डावात केवळ ४६ धावा करता आल्या. रिषभ पंत (२०) वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. मोहम्मद सिराज (४) धावा करुन नाबाद परतला, तर यशस्वी जैस्वाल (१३), रोहित शर्मा (२), कुलदीप यादव (२), जसप्रीत बुमराहने (१) धावा केली. विशेष बाब म्हणजे विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, रवींद्र जडेजा, आर अश्विन यांना खातेही उघडता आले नाही.
भारताचा संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, सर्फराज खान, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंडचा संघ -
टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉन्वे, विल यंग, डेरिल मिचेल, रचिन रविंद्र, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, टिम साउदी, मॅट हेनरी, जॅकब डफी, एजाज पटेल, विलियम ओरोर्के.