Join us  

ॲक्शन, इमोशन आणि..., टीम इंडियाचे विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन; पाहा Inside Video

Ind Vs Nz, ICC CWC 2023: न्य़ूझीलंडवर ७० धावांनी मात करत २०१९ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आणि २०२१ च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढल्यानंतर भारतीय संघानं विजयाचं जंगी सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचा बीसीसीआयने शेअर केलेला व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 1:12 PM

Open in App

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून येत आहे. भारतीय संघाने साखळीतील सर्वच्या सर्व नऊ सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर काल झालेल्या उपांत्य लढतीत टीम इंडियाने न्यूझीलंडवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान, न्य़ूझीलंडवर ७० धावांनी मात करत २०१९ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आणि २०२१ च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढल्यानंतर भारतीय संघानं विजयाचं जंगी सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचा बीसीसीआयने शेअर केलेला व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये भारतीय संघातील खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये विजयाचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. संघातीस सर्व खेळाडू, प्रशिक्षक वर्ग, सपोर्ट स्टाफ सर्वजण रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत. तसेच गळाभेट घेऊन एकमेकांचं अभिनंदन करताना दिसत आहेत. सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये परतत असलेल्या रोहित, मोहम्मद शमी, विराट कोहली यांचे फोटो काढण्यासाठी तसेच अभिनंदन करण्यासाठी गर्दी झालेली दिसत आहे. 

त्याबरोबरच वर्ल्डकपसाठी भारतीय संघात समावेश नसलेला युझवेंद्र चहल हासुद्धा ड्रेसिंग रूममध्ये येऊन संघ सहकाऱ्यांचं अभिनंदन करताना दिसत आहे. तर भारतीय संघ वानखेडे स्टेडियममधून हॉटेलच्या दिशेने निघाल्यावर क्रिकेटप्रेमी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून सर्वांचं अभिनंदन करताना दिसत आहेत. तर हॉटेलवर पोहोचल्यावर तिथेही टीम इंडियाचं जोरदार स्वागत झालेलं दिसत आहे.

दरम्यान, काल न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद ३९७ धावा कुटून काढल्या होत्या. भारताकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी खेळी केल्या. शुभमन गिलने शानदार अर्धशतक फटकावले. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनीही उपयुक्त खेळी केल्या होत्या. भारताने दिलेल्या आव्हानाचा न्यूझीलंडने जोरदार पाठलाग केला. मात्र मोहम्मद शमीने सात बळी टिपत न्यूझीलंडचा प्रतिकार ३२७ धावांवर संपुष्टात आणला आणि भारताला ७० धावांनी विजय मिळवून दिला.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारत विरुद्ध न्यूझीलंड