चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करून संघाला फायनलपर्यंत पोहचवणारा विराट कोहली न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात अवघ्या एका धावेवर तंबूत परतला. चेज मास्टर किंग कोहली आला अन् एक धाव करून गेला. ब्रेसवलच्या गोलंदाजीवर तो पायचित झाला अन् पंचांनी न्यूझीलंडच्या अपलीला दात देत बोट वर केले. भारतीय संघानं 'विराट' विकेट वाचवण्यासाठी रिव्ह्यू घेतला, पण तो काही कामी आला नाही. पंचाचा निर्णय कायम राहिला अन् रिव्ह्यूसह टीम इंडियानं कोहलीच्या रुपात मोठी विकेट गमावली.
विराट कोहलीची विकेट अन् अनुष्का शर्माची रिअॅक्शन
न्यूझीलंडचं बळं तर टीम इंडियाची धकधक वाढवणारा सीन
किंग कोहलीची विकेट पडल्यावर दुबईच्या स्टेडियममध्ये एकच शांतता पसरली. स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्का शर्माची रिअॅक्शनही चर्चेत आहे. तिने तोंडावर बोट ठेवून केलेला इशारा स्टेडियममधील शांततेचा एक पुरावाच होता. धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. तो मैदानात असला की, विजयाची खात्री असते, पण तो स्वस्तात परतल्यामुळे न्यूझीलंडच्या ताफ्यात बळ अन् टीम इंडियात निराशा असा माहोल निर्माण करणारे होते.
विराट विकेटनंतर अय्यरवर मोठी जबाबदारी
रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीनं पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची दमदार भागीदारी रचली. ग्लेन फिलिप्सनं पुन्हा एकदा शानदार झेल पकडत गिलच्या खेळीला ३१ धावांवर ब्रेक लावला. पुढच्याच षटकात विराट कोहलीच्या रुपात टीम इंडियाला धक्का बसला. कोहली हा मैदानात तग धरून सिंगल डबल धावा करत धावफलक हलवता ठेवतो. ही गोष्ट सातत्याने विराट कोहलीनं दाखवून दिलीये. तो आउट झाल्यावर आता त्याची जबाबदारी श्रेयस अय्यरवर येऊन पडली. कारण त्याच्यापाठोपाठ रोहित शर्माच्या रुपातही टीम इंडियाने तिसरी विकेट गमावलीये. जबरदस्त खेळी करत असताना रोहित शर्मा चुकीचा फटका मारताना बाद झाला. त्याने ७ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ७६ धावांची खेळी केली.