Join us  

IND vs NZ, 3rd T20I Live : भारताने मालिका जिंकून पाकिस्तानचा विक्रम मोडला, न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ६६ धावांत माघारी पाठवला

India vs New Zealand, 3rd T20I Live : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दणदणीत विजयाची नोंद करताना मालिका २-१ अशी जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 10:12 PM

Open in App

India vs New Zealand, 3rd T20I Live : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दणदणीत विजयाची नोंद करताना मालिका २-१ अशी जिंकली. शुभमन गिलचे ( Shubman Gill) विक्रमी शतक आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. शुभमनने आजच्या या नाबाद १२६ धावांच्या खेळीने मोठमोठे विक्रम मोडले. त्याच्या फटकेबाजीनंतर भारतीय जलदगती गोलंदाजांनी कमाल केली. त्यात सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) टिपलेले तीन भन्नाट झेल, सामन्याला कलाटणी देण्यासाठी पुरेसे ठरले.  

शुभमन गिलने १२ चौकार व  ७ षटकारांसह १२६ धावांवर नाबाद राहिला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात युवा वयात शतक झळकाण्याचा विक्रमही शुभमनने नावावर केला. तो २३ वर्ष व१४६ दिवसांचा आहे आणि त्याने सुरेश रैनाचा ( २३  वर्ष व १५६ दिवस) विक्रम मोडला. राहुल त्रिपाठी व शुभमन यांनी चांगली फटकेबाजी करून ४२ चेंडूंतील ८० धावांची भागीदारी केली.  राहुल २२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावांवर माघारी परतला. सूर्यकुमार यादव २४ धावांवर बाद झाला. सूर्या व गिलने २५ चेंडूंत ३८ धावा जोडल्या.  हार्दिक १७ चेंडूंत ३० धावा करून माघारी परतला. 

प्रत्युत्तरात न्यूझीलंडची सुरुवात अत्यंत वाईट झाली. हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात फिन अॅलनला बाद केले. सूर्यकुमारने स्लीपमध्ये अप्रतिम झेल घेतला. त्यानंतर पुढच्याच षटकात अर्शदीप सिंगने दोन धक्के दिले. डेव्हॉन कॉनवे व मार्क चॅम्पमन माघारी परतले. हार्दिकने तिसऱ्या षटकात ग्लेन फिलिप्सचा अथथळा दूर करताना भारताला मोठे यश मिळवून दिले. सूर्याने तशाच पद्धतीने विकेट घेतली. उम्रान मलिकने मायकेल ब्रेकवेलला बाद करून किवींचा निम्मा संघ २१ धावांवर माघारी पाठवला. 

डॅरील मिचेल व कर्णधार मिचेल सँटनर यांनी २४ चेंडूंत ३२ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडचा डाव सावरला. पण, सूर्यकुमारने पुन्हा एकदा सुरेख झेल टिपला. शिवम मावीच्या गोलंदाजीवर सँटनरने मारलेला ( १३) खणखणीत फटका सूर्याने सीमारेषेवर अचूक टिपला.  त्याच षटकात राहुल त्रिपाठीने पॉईंटला हवेत झेपावत इश सोढीचा झेल घेतला अन् किवींचा डाव ७ बाद ५३ असा गडगडला. किवी फलंदाजांचं विकेट फेकण्याचं सत्र सुरूच राहिले. ल्युकी फर्ग्युसनही शून्यावर हार्दिकच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.  

हार्दिकने आणखी एक धक्का दिला अन् त्याने ४ षटकांत १६ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ६६ धावांत माघारी पाठवून भारताने १६८ धावांनी विजय मिळवला. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील हा भारताचा सर्वात मोठा विजय ठरला. कसोटी खेळणाऱ्या देशांमधील संघाचा ट्वेंटी-२०तील हा दुसरा मोठा विजय ठरला. श्रीलंकेने २००७मध्ये केनियावर १७२ धावांनी विजय मिळवला होता. भारताने आज पाकिस्तानचा ( १५५ धावा वि. हाँगकाँग, २०२२) विक्रम मोडला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याशुभमन गिल
Open in App