IND vs NZ, 2nd Test : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडवर ३७२ धावांनी विजय मिळवून दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी जिंकली. या विजयासह भारतानं आयसीसी कसोटी क्रमवारीतही अव्वल स्थान पटकावलं आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत १२ गुणांची कमाई करताना तिसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली. पण, या कसोटीत सर्वांची वाहवाह मिळवली ती न्यूझीलंडचा गोलंदाज एजाझ पटेल ( Ajaz Patel) यानं... कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात १० विकेट्स घेणारा तो जगातला तिसरा गोलंदाज ठरला. जिम लेकर व अनिल कुंबळे यांनी याआधी हा पराक्रम केला आहे. त्यामुळे सामन्यानंतर भारतीय संघानं एजाझ पटेलला भारी गिफ्ट दिलं. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडूनही एजाझचा सन्मान केला गेला.
२१ ऑक्टोबर १९८८मध्ये मुंबईत जन्मलेला एजाझ ८ वर्षांचा असताना कुटुंबीयांनी न्यूझींलड येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आज ३४ वर्षीय एजाझनं जन्मभूमीत दहा विकेटस घेत मोठा विक्रम केला. इंग्लंडच्या जिम लेकर यांनी १९५६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर कसोटीत एका डावात १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर भारताच्या अनिल कुंबळेनं १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. एजाझनं ४७.५ षटकांत ११९ धावांत १० विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात एजाझनंही चार विकेट्स घेतल्या.
विरेंद्र सेहवागनं ( Virender Sehwag) भारताच्या विजयानं एजाझ पटेलच्या विक्रम झाकोळला यावर खंत व्यक्त केली.
भारतीय संघातील खेळाडूंनी टीम इंडियाच्या जर्सीवर स्वाक्षरी करून एजाझ पटेलला भेट म्हणून दिली.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनीही कसोटीची स्कोअरशीट फ्रेम करून एजाझला भेट दिली. किवी गोलंदाजानंही त्याची जर्सी व चेंडू MCA ला भेट दिला.