Join us

IND vs NZ, 2nd Test : प्लेईंग इलेव्हनमध्ये नव्हतं नाव, तरीही न्यूझीलंडचा खेळाडूनं पटकावला लाख रुपयांचा पुरस्कार

IND vs NZ, 2nd Test : भारतीय संघानं घरच्या मैदानावर सलग १४वी कसोटी मालिका जिंकली. न्यूझीलंडला दुसऱ्या कसोटीत भारताकडून ३७२ धावांनी हार मानावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 17:42 IST

Open in App

IND vs NZ, 2nd Test : भारतीय संघानं घरच्या मैदानावर सलग १४वी कसोटी मालिका जिंकली. न्यूझीलंडला दुसऱ्या कसोटीत भारताकडून ३७२ धावांनी हार मानावी लागली. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी कानपूर कसोटीत टीम इंडियाच्या तोंडचा विजयाचा घास हिसकावला होता, परंतु मुंबई कसोटीत भारतीय खेळाडूंनी कमाल करताना १-० अशी मालिका खिशात घातली. या सामन्यात न्यूझीलंडच्या एजाझ पटेलनं डावात १० विकेट्स घेऊन इतिहास रचला. कसोटीच्या एका डावात १० विकेट्स घेणारा तो जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्यानंतरचा तिसरा गोलंदाज ठऱला. 

भारतानं घरच्या मैदानावर २०१३पासून सुरू असलेली कसोटी मालिका विजयाची परंपरा कायम राखली. भारताचा हा घरच्या मैदानावरील १४वा कसोटी मालिका विजय ठरला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा ११वा कसोटी मालिका विजय ठरला. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावरील भारताचा हा सलग चौथा कसोटी मालिका विजय आहे. भारतानं घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध १२ कसोटी मालिका खेळल्या आणि त्यापैकी एकही गमावली नाही.

मन्यानंतरच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात एजाझ पटेलला १ लाखांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. मयांक अग्रवालनं सामनावीर, तर आर अश्विननं मालिकावीर हा पुरस्कार पटकावला. पण, न्यूझीलंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही नसणाऱ्या मिचेल सँटनरनंही एक लाख रुपयांचा पुरस्कार पटकावला. पहिल्या दिवसाच्या ४७व्या षटकात श्रेयस अय्यरनं टोलावलेला चेंडू सँटनरनं सीमारेषेवर अडवला होता आणि संघासाठी त्यानं पाच धावा वाचवल्या. सामन्यात सर्वोत्तम क्षेत्ररक्षण म्हणून त्याला हा पुरस्कार दिला गेला.

ट्वेंटी-२० मालिकेत भारताचा गोलंदाज दीपक चहर यानं मार्टिन गुप्तील याच्याकडे रागानं पाहिलं होतं आणि त्या क्षणासाठी चहरला १ लाखांचा धनादेश दिला गेला होता.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडबीसीसीआय
Open in App