India vs New Zealand, 2nd Test Live Updates : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवला. भारतानं ठेवलेल्या ५४० धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा दुसरा डाव १६७ धावांवर गडगडला. भारतानं हा सामना ३७२ धावांनी जिंकला, भारताचा हा कसोटीतील सर्वात मोठा विजय ठरला. २०२१मध्ये सर्वाधिक ७ कसोटी जिंकण्याचा विक्रम भारतानं नावावर करताना पाकिस्तान ( ६) व इंग्लंड ( ४) यांना मागे टाकले. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये ५० विजय मिळवणारा विराट कोहली हा पहिलाच कर्णधार ठरला आहे. या विजयानंतर टीम इंडियाचे माजी खेळाडूंनी कौतुक केले, परंतु सचिन तेंडुलकरचं ( Sachin Tendulkar) ट्विट चर्चेचा विषय ठरतंय.
भारताच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. भारतानं ७ बाद २७६ धावांवर दुसरा डाव घोषित केला. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात हेन्री निकोल्स ( ४४) व डॅरील मिचेल ( ६०) यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला सामना केला. मिचेलनं वैयक्तिक अर्धशतकासह निकोल्सह ७३ धावांची भागीदारी केली. निकोल्स व मिचेल यांच्याशिवाय न्यूझीलंडच्या अन्य फलंदाजांचा भारतीय गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. न्यूझीलंडचा डाव १६७ धावांवर गुंडाळून भारतानं ३७२ धावांनी विजय मिळवला. आर अश्विन व जयंत यादव यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या. या मालिकेत १४ विकेट्स घेणाऱ्या आर अश्विनला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.
सचिन तेंडुलकरनं ट्विट केलं की, ''या विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. ही स्पेशल कसोटी मॅच ठरली, कारण चारही डावांत भारतीय गोलंदाजांनी सर्व विकेट्स घेतल्या.''
मुंबई कसोटीतील पहिल्या डावात भारतीय वंशाचा परंतु न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या एजाझ पटेलनं १० विकेट्स घेतल्या. त्यानंतर भारताकडून मोहम्मद सिराज ( ३), अक्षर पटेल ( २), आर अश्विन ( ४) व जयंत यादव ( १) यांनी विकेट्स घेताना किवींचा डाव ६२ धावांवर गुंडाळला. भारताच्या दुसऱ्या डावात ७ विकेट्स पडल्या आणि त्या एजाझ पटेल ( ४) व भारतीय वंशाच्याच राचिन रविंद्र ( ३) यांनी घेतल्या. चौथ्या डावात अश्विन व जयंत यांनी प्रत्येकी चार व अक्षरनं १ विकेट घेतल्या. त्यामुळे तेंडुलकरचं ट्विट व्हायरल होत आहे.