India vs New Zealand, 2nd Test Live Update : विराट कोहलीच्या पुनरागमनानं टीम इंडियाच्या ताफ्यात आक्रमकता आली... गोलंदाजांचे मनोबल उंचावताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना डिवचणारा विराट पुन्हा मैदानावर पाहून चाहतेही आनंदात दिसले. एजाझ पटेलनं ( Ajaz Patel) टीम इंडियाच्या सर्व शिलेदारांना माघारी पाठवल्यानंतर विराटनं भारतीय गोलंदाजांचा उत्साह वाढवला अन् किवींचा पहिला डाव २८.१ षटकांत गडगडला. भारताच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. आज दिवसभर भारताच्या ६ व न्यूझीलंडच्या १० अशा १६ विकेट्स पडल्या आणि त्यापैकी १३ विकेट्स या फिरकीपटूंनी घेतल्या.
४ बाद २२१ वरून भारतानं आज डावाची सुरूवात केली. परंतु दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात एजाझनं सहाला ( २७) पायचीत केलं अन् पुढच्याच चेंडूवर आर अश्विनला त्रिफळाचीत केलं. अक्षर व मयांक यांनी सातव्या विकेटसाठी दमदार खेळ केला. मयांक ३११ चेंडूंत १७ चौकार व ४ षटकारांसह १५० धावांवर एजाझच्या गोलंदाजीवर माघारी परतला. अक्षरनं ११३ चेंडूंत कसोटीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. पण, एजाझनं पुन्हा खोडा घातला, अक्षरला ५२ धावांवर पायचीत केले. त्यानंतर जयंत यादव व मोहम्मद सिराज यांची विकेट घेत एजाझनं इतिहास रचला. भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर गुंडाळला. एजाझनं ४७.५ षटकांत ११९ धावांत १० विकेट्स घेतल्या. त्यानं १२ निर्धाव षटकंही फेकली.