India vs New Zealand, 2nd Test Live Update : किवी गोलंदाज एजाझ पटेलनं ( Ajaz Patel) आज स्पेशल क्लबमध्ये स्थान पटकावले. मुंबईत जन्मलेल्या एजाझनं वानखेडेवर टीम इंडियाचा पहिला डाव एकट्यानं गुंडाळला. त्यानं ११९ धावा देताना १० विकेट्स घेतल्या आणि कसोटीच्या एका डावात असा पराक्रम करणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला. जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्या क्लबमध्ये एजाझचं नाव दाखल झालं आहे.
![]()
२१ ऑक्टोबर १९८८मध्ये मुंबईत जन्मलेला एजाझ ८ वर्षांचा असताना कुटुंबीयांनी न्यूझींलड येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आज ३४ वर्षीय एजाझनं जन्मभूमीत दहा विकेटस घेत मोठा विक्रम केला. भारताचा महान फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी ट्विट करून एजाझचं कौतुक केलं. त्यानं लिहिलं की, परफेक्ट १० क्लबमध्ये तुझं स्वागत. चांगली गोलंदाजी केली. कसोटीच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी अशी कामगिरी करून एक वेगळं यश तू मिळवलं आहेस.
मयांक अग्रवालचे दीडशतक आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकी खेळीवर
न्यूझीलंडचा गोलंदाज
एजाझ पटेल ( Ajaz Patel) यानं पाणी फिरवलं. इंग्लंडच्या जिम लेकर यांनी १९५६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर कसोटीत एका डावात १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर भारताच्या अनिल कुंबळेनं १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. एजाझनं ४७.५ षटकांत ११९ धावांत १० विकेट्स घेतल्या. त्यानं १२ निर्धाव षटकंही फेकली.
४ बाद २२१ वरून भारतानं आज डावाची सुरूवात केली. परंतु दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात एजाझनं सहाला ( २७) पायचीत केलं अन् पुढच्याच चेंडूवर आर अश्विनला अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत केलं. अक्षर व मयांक यांनी सातव्या विकेटसाठी दमदार खेळ केला. ही जोडी तोडण्यासाठी टीम साऊदी, कायले जेमिन्सन, विलियम सोमरविले या सर्वांनी प्रयत्न केले, परंतु अखेर यश एजाझ पटेललाच मिळाले. त्यानं लंच ब्रेकनंतर पटेलनं मोठी विकेट घेतली. मयांक ३११ चेंडूंत १७ चौकार व ४ षटकारांसह १५० धावांवर माघारी परतला. अक्षरनं ११३ चेंडूंत कसोटीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. पण, एजाझनं पुन्हा खोडा घातला, अक्षरला ५२ धावांवर पायचीत केले. त्यानंतर जयंत यादव व मोहम्मद सिराज यांची विकेट घेत एजाझनं इतिहास रचला. भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर गुंडाळला.