Join us  

IND Vs NZ, 2nd Test: भारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी आजपासून, पावसाने वाढवली चिंता, तर भारतीय संघात संतुलन साधण्याचे द्रविड-कोहलीपुढे आव्हान

IND Vs NZ, 2nd Test: न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकण्यात थोडक्यात अपयश आल्यानंतर शुक्रवारपासून वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने कंबर कसली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 7:50 AM

Open in App

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकण्यात थोडक्यात अपयश आल्यानंतर शुक्रवारपासून वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने कंबर कसली आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन होणार असल्याने संघात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, गेले दोन दिवस मुंबईत पावसाने हजेरी लावल्याने सामन्यावर संकटही निर्माण झाले आहे. त्यातच प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार कोहली यांच्यापुढे संघाचे संतुलन साधण्याचे मुख्य आव्हान आहे.

कानपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडच्या अखेरच्या जोडीने संयमी फलंदाजी करताना सामना अनिर्णीत राखून भारताला विजय मिळवू दिला नाही. दुसऱ्या कसोटीसाठी कोहलीचे पुनरागमन होणार असल्याने भारतीय संघात काही बदल नक्कीच पाहण्यास मिळतील. हवामान खात्याने शुक्रवारीही पावसाची शक्यता वर्तविली असल्याने पहिल्या दिवशी खेळ होण्याची शक्यता कमी वर्तविली जात आहे. गुरुवारपर्यंत खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली होती. अशा परिस्थितीत दोन्ही संघ परिस्थितीनुसार संघात बदल करतील. शिवाय यावेळी नाणेफेकीचा कौलही महत्त्वाचा ठरेल. पावसामुळे खेळपट्टी काहीशी ओलसर राहणार असल्याने वेगवान गोलंदाजांना फायदा होईल. यामुळे न्यूझीलंड संघ नील वॅगनरच्या रूपाने अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवू शकतो.

दुसरीकडे, काही प्रमुख खेळाडूंकडून विशेष करून फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी होत नसल्याने भारतीय संघात मोठे बदल पाहण्यात येऊ शकतील. त्यामुळे द्रविड आणि कोहली यांच्यापुढे संघाचे संतुलन राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे कानपूर येथे कसोटी पदार्पण करत पहिल्या डावात शतक, तर दुसऱ्या डावात अर्धशतक करणाऱ्या मुंबईकर श्रेयस अय्यरचे संघातील स्थानही पक्के नाही. अजिंक्य रहाणे गेल्या १२ डावांत अपयशी ठरला आहे. 

मात्र, पहिल्या कसोटीत त्याने संघाचे नेतृत्व केले असल्याने त्याला संघाबाहेर बसवण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. चेतेश्वर पुजारालाही सातत्याने अपयशी ठरल्यानंतरही केवळ अनुभवाच्या जोरावर संघात स्थान मिळत आहे. इंग्लंडमध्ये काहीसा आक्रमक खेळलेला पुजारा कानपूरमध्ये पुन्हा अतिबचावात्मक खेळला.

पाच वर्षांनी वानखेडेवर रंगणार कसोटी सामनामुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या वानखेडे स्टेडियमवर तब्बल पाच वर्षांनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामना रंगणार आहे. याआधी येथे १२ डिसेंबर २०१६ रोजी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना रंगला होता. त्यावेळी भारताने एक डाव आणि ३६ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. 

सलामीला कोण? विराट कोहली मयांक अग्रवालची जागा घेणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र, त्यामुळे शुभमन गिलसोबत सलामीला कोण खेळणार, असाही प्रश्न आहे. सध्याच्या परिस्थितीत पुजाराचा पर्याय चुकीचा ठरू शकतो. यष्टिरक्षक के. एस. भरतचा यासाठी विचार होऊ शकतो. अनुभवी यष्टिरक्षक रिद्धिमान साहा मानेच्या दुखापतीमुळे त्रस्त असल्याने त्याच्या जागी भरतला संधी मिळाल्यास तो गिलसोबत डावाची सुरुवात करेल.

सिराजला संधी? अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला खराब कामगिरीमुळे टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यातच मुंबईतील पावसाचे वातावरण पाहता स्विंग माऱ्यासाठी संघात बदल होण्याची शक्यता असल्याने इशांतच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते. तसेच तिन्ही फिरकीपटूंचे संघातील स्थान कायम राहण्याची शक्यता अधिक आहे.

खेळपट्टी झाकून ठेवल्याने स्विंग मिळेल - साऊदी‘मुंबईतील तापमान खूप कमी झाले असून, खेळपट्टीही दीर्घकाळ झाकून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजांना स्विंग मिळू शकेल,’ असा विश्वास न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी याने व्यक्त केला आहे. शुक्रवारपासून रंगणाऱ्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी साऊदीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. खेळपट्टीविषयी त्याने सांगितले की, ‘खेळपट्टीकडून किती मदत मिळेल, हे सांगता येणार नाही. यासाठी आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. परिस्थितीनुसार आम्हाला जुळून घ्यावे लागेल. खेळपट्टी झाकून असल्याने स्विंग मिळण्याची शक्यता अधिक आहे. हे नक्कीच वेगळे आव्हान ठरेल; पण जी काही परिस्थिती असेल, त्यानुसार प्रत्येकाला जुळवून घ्यावे लागेल.’ 

प्रतिस्पर्धी संघभारत : विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, जयंत यादव, श्रीकर भरत आणि प्रसिद्ध कृष्णा.न्यूझीलंड : केन विलियमसन (कर्णधार), टॉम लॅथम, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल, विल यंग, ग्लेन फिलिप्स, डेरिल मिशेल, टिम साउदी, नील वॅगनर, काएल जेमिसन, विलियम सोमरविले, एजाझ पटेल, मिशेल सँटनर आणि रचिन रवींद्र. 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडमुंबईविराट कोहलीराहुल द्रविड
Open in App