India vs New Zealand, 2nd T20I Live : भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना न्यूझीलंडच्या धावगतीवर वेसण घातले. युझवेंद्र चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा निर्णय योग्य ठरला. भारताच्या चार फिरकीपटूंनी किवी फलंदाजांना तालावर नाचवले आणि त्यांनी कसाबसा शतकी पल्ला गाठला. युझवेंद्र चहलने आज मोठा विक्रम नोंदवला.
भारतीय मुली वर्ल्ड कप विजेत्या; बीसीसीआयने ५ कोटींच्या बक्षिसाची केली घोषणा, Jay Shah यांचे निमंत्रण
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. उम्रान मलिकच्या जागी आज युझवेंद्र चहलची निवड करण्यात आली आहे. पृथ्वी शॉ याला पुन्हा एकदा बाकावरच बसवले आहे. फिन अॅलन आणि डेव्हॉन कॉनवे यांनी न्यूझीलंडला सकारात्मक सुरुवात करून दिली. हार्दिकने दुसऱ्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजीवर आणले. त्यात हार्दिकने टाकलेल्या तिसऱ्या षटकात इशानने २ धावांवर खेळणाऱ्या फिनचा झेल सोडला. युझवेंद्र चहलने मिळालेल्या संधीचं सोनं केलं अन् त्याच्या पहिल्याच षटकात फिनला ( ११) माघारी पाठवलं. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात चेंडू फिनच्या पायाला लागून यष्टींवर आदळला. चहलने निर्धाव षटक टाकून एक विकेट घेतली. भारताकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक ९१ विकेट्स घेत भुवनेश्वर कुमारचा ( ९०) विक्रम मोडला.
वॉशिंग्टनच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात कॉनवे ( ११ ) झेलबाद झाला. चेंडू त्याच्या ग्लोव्ह्जला घासून इशानच्या हाती विसावला. दीपक हुडाच्या गोलंदाजीवर ग्लेन फिलिप्स ( ५) रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत झाला.
कुलदीप यादवनेही डॅरील मिचेलचा ( ८) त्रिफळा उडवला. मार्क चॅम्पमन व मायकेल ब्रेसवेल संभाळून खेळत होते, परंतु त्यांच्यातला ताळमेळ तुटला अन् चॅम्पमन ( १४) रन आऊट झाला. युझवेंद्रला आजच्या सामन्यात निवड करून चार फिरकीपटूंसह खेळण्याचा हार्दिकचा निर्णय योग्य ठरला. दीपक हुडा ( १-१७) व कुलदीप ( १-१७) यांनी चार षटकांत किवींना जखडून ठेवले. हार्दिकने १७व्या षटकात ब्रेसवेलला ( १४) बाद केले, अर्शदीप सिंगने सीमारेषेवर अप्रतिम झेल घेतला.
![]()
हार्दिकने अर्शदीपला १८व्या षटकात पहिले षटक टाकण्यास बोलावले अन् त्याने ईश सोढीला बाद केले. यावेळी अर्शदीपच्या गोलंदाजीवर हार्दिकने सोपा झेल घेतला. अर्शदीपने त्याच षटकात किवींना दुसरा धक्का देत त्यांची अवस्था ८ बाद ८३ अशी दयनीय केली. न्यूझीलंडला ८ बाद ९९ धावाच करता आल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"