Join us  

IND vs NZ, 1st Test Live Updates : श्रेयस अय्यरनं मोडला ८८ वर्षांपूर्वीचा विक्रम; भारतीय संघानं डाव घोषित करताना किवींसमोर उभा केला धावांचा डोंगर

India vs New Zealand, 1st Test Live Updates :  ५ बाद ५१ धावांवर असलेल्या टीम इंडियाच्या मदतीला पुन्हा एकदा पदार्पणवीर श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) धावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 4:12 PM

Open in App

India vs New Zealand, 1st Test Live Updates :  ५ बाद ५१ धावांवर असलेल्या टीम इंडियाच्या मदतीला पुन्हा एकदा पदार्पणवीर श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) धावला. त्याच्या जोडीला आर अश्विन खेळपट्टीवर ठाण मांडून न्यूझीलंडच्या गोलंदाजांना भिडला. दुखापतीमुळे क्षेत्ररक्षणासाठी न उतरलेला वृद्धीमान सहा यानंही अर्धशतकी खेळ करून भारताच्या डावात मोठा वाटा उचलला. त्याला अक्षर पटेलची साथ मिळाली आणि भारतानं या खेळाडूंच्या जोरावर न्यूझीलंडसमोर तगडं आव्हान उभं केलं. 

रवींद्र जडेजा (५०), शुबमन गिल (  ५२) आणि  श्रेयस अय्यर ( १०५) यांच्या दमदार खेळीनंतरही भारताला ३४५ धावांवर समाधान मानावे लागले.  प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम व विल यंग यांनी पहिल्या विकेटसाठी १५१ धावांची भागीदारी केली. पण, तिसऱ्या दिवशी अक्षर पटेलनं त्यांना बॅकफूटवर फेकले. यंग ८९ आणि लॅथम ९५ धावांवर बाद झाले. त्यांच्यानंतर कायले जेमिन्सन ( २३) हा किवींकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. अक्षर पटेलनं ६२ धावांत ५ विकेट्स घेतल्या. आर अश्विननं ८२ धावांत ३ बळी टिपले. किवींना पहिल्या डावात २९६ धावाच करता आल्या. 

भारतानं ४९ धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाची सुरुवात केली. पण, शुबमन गिल ( १), अजिंक्य रहाणे ( ४), चेतेश्वर पुजारा ( २२), मयांक अग्रवाल ( १७) आणि रवींद्र जडेजा ( ०) हे झटपट माघारी परतल्यानं भारताची अवस्था ५ बाद ५१ अशी झाली होती. मात्र, आर अश्विन व श्रेयस अय्यर या जोडीनं खिंड लढवताना संघाच्या खात्यात ५२ धावांची भर घातली.  जेमिन्सननं ही जोडी तोडताना अश्विनला ( ३२) बाद केलं. श्रेयस आत्मविश्वासानं खेळला. त्यानं दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावून मोठा पराक्रम केला. पदार्पणाच्या सामन्यात शतक व अर्धशतक झळकावणारा श्रेयस हा पहिला भारतीय ठरला आहे. त्यानं पहिल्या डावात १०५ धावा केल्या होत्या. त्याची ही घोडदौड टीम साऊदीनं रोखली. त्यानं चौथ्या दिवशी १२५ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६५ धावा करताना संघाला मोठी आघाडी मिळवून दिली.  

पदार्पणाच्या कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये श्रेयसनं तिसरे स्थान पटकावले. त्यानं १७० धावा करून लाला अमरनाथ यांचा १५६ ( ३८+११८ वि. इंग्लंड, १९३३) धावांचा विक्रम मोडला. Most runs in debut Test for India या यादीत शिखर धवन ( १८७ वि. ऑस्ट्रेलिया, २०१३) व रोहित शर्मा ( १७७ धावा वि. वेस्ट इंडिज, २०१३) हे आघाडीवर आहेत. 

श्रेयस- अश्विन माघारी परतल्यानंतर आता टीम इंडियाचा डाव गडगडेल असे वाटले, परंतु  वृद्धीमान सहा व अक्षर पटेल यांनी किवी गोलंदाजांना झुंजवले. या दोघांनी ८व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. दुखापतग्रस्त असूनही सहा खेळपट्टीवर चिटकून बसला अन् त्यानं अर्धशतकही पूर्ण केलं. या जोडीनं ७ बाद १६७ धावांवरून टीम इंडियाला ७ बाद २३४ धावांपर्यंत मजल  मारून दिली. भारतानं किवींसमोर २८४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सहा ६१  व अक्षर २८ धावांवर नाबाद राहिले. 

भारतानं २८०+ धावांची आघाडी घेताना किवींसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. आतापर्यंत भारतात चौथ्या डावात  पाहुण्या संघाला २८०+ धावांच्या लक्ष्याचा एकदाही पाठलाग करता आलेला नाही. १९ ८७मध्ये वेस्ट इंडिजनं दिल्ली कसोटीत व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या नेतृत्वाखाली ५ बाद २७६ धावा करून विजय मिळवला होता. 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडश्रेयस अय्यरवृद्धिमान साहा
Open in App