India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारतीय खेळाडूंची चौथ्या दिवसाच्या खेळात वर्चस्व गाजवले. ५ बाद ५१ अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला श्रेयस अय्यर, आर अश्विन, वृद्धीमान सहा व अक्षर पटेल या चौकडीनं सावरलं. त्यांच्या उल्लेखनीय खेळाच्या जोरावर भारतानं दुसरा डाव ७ बाद २३४ धावांवर घोषित केला. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं सलामीवीर विल यंगची विकेट गमावली. पण, ती विकेट आर अश्विनला नशिबानं मिळाली. त्यावरून बराच वेळ खेळपट्टीवर चर्चा रंगली.
![]()
भारताच्या पहिल्या डावातील ३४५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडला २९६ धावा करता आल्या. भारतानं ४९ धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाची सुरुवात केली. पण, शुबमन गिल ( १), अजिंक्य रहाणे ( ४), चेतेश्वर पुजारा ( २२), मयांक अग्रवाल ( १७) आणि रवींद्र जडेजा ( ०) हे झटपट माघारी परतल्यानं भारताची अवस्था ५ बाद ५१ अशी झाली होती. मात्र, आर अश्विन व श्रेयस अय्यर या जोडीनं खिंड लढवताना संघाच्या खात्यात ५२ धावांची भर घातली. जेमिन्सननं ही जोडी तोडताना अश्विनला ( ३२) बाद केलं. श्रेयस आत्मविश्वासानं खेळला. त्याची घोडदौड टीम साऊदीनं रोखली. श्रेयसनं १२५ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६५ धावा करताना संघाला मोठी आघाडी मिळवून दिली.
श्रेयस- अश्विन माघारी परतल्यानंतर आता टीम इंडियाचा डाव गडगडेल असे वाटले, परंतु वृद्धीमान सहा व अक्षर पटेल यांनी किवी गोलंदाजांना झुंजवले. या दोघांनी ८व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. दुखापतग्रस्त असूनही सहा खेळपट्टीवर चिटकून बसला अन् त्यानं अर्धशतकही पूर्ण केलं. या जोडीनं ७ बाद १६७ धावांवरून टीम इंडियाला ७ बाद २३४ धावांपर्यंत मजल मारून दिली. भारतानं किवींसमोर २८४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सहा ६१ व अक्षर २८ धावांवर नाबाद राहिले.
![]()
न्यूझीलंडची दुसऱ्या डावाची सुरूवात काही खास झाली नाही. पहिल्या डावातील अर्धशतकवीर विल यंग ( २) पायचीत झाला. त्यानं DRS घेतला असता तर आर अश्विनला ही विकेट मिळाली नसती. अश्विननं या विकेटसह हरभजन सिंगच्या ४१७ विकेट्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. विल यंग व टॉम लॅथम यांनी चर्चा करण्यात एवढा वेळ घेतला की १५ सेंकदाचा अवधी निघून गेल्यानंतर यंगनं DRS साठी अपील केली. पण भारतीय खेळाडूंनी त्याला विरोध केला. चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडनं १ बाद ४ धावा केल्या आणि त्यांना पाचव्या दिवशी २८० धावा करायच्या आहेत. तर भारताला विजयासाठी ९ विकेट्स घ्यायच्या आहेत.
Web Title: IND vs NZ, 1st Test Live Updates : India needs 9 wickets to win on Day 5, will Young asks for a referral after the time is out
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.