IND vs ENG ODI : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी सामन्यानंतर तो पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसेल. इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेआधी विराट कोहली जवळपास १२ वर्षांनी रणजी मॅचसाठी मैदानात उतरण्याचे पाहायला मिळाले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. आता इंग्लंड विरुद्धच्या वनडेत तो पुन्हा एकदा आपल्यातील धमक दाखवण्यासाठी उत्सुक असेल. या मालिकेत विराट कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. जाणून घेऊया त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
किंग कोहलीकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी विराट कोहलीला इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत वनडेत १४ हजार धावांचा पल्ला गाठण्याची संधी आहे. यासाठी त्याला फक्त ९४ धावा करायच्या आहेत. नागपूरच्या मैदानात त्याच्या भात्यातून मोठी खेळी आली तर पहिल्याच सामन्यात तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडून नवा विश्व विक्रम प्रस्थापित करू शकतो.
सचिनच्या नावे आहे वर्ल्ड रेकॉर्ड
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीत १८४२६ धावा केल्या आहेत. हा पल्ला गाठण्याआधी सर्वात जलद १४ हजार धावांचा पल्ला गाठण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही सचिनने आपल्या नावे केला होता. जो अद्यापही अबाधित आहे. सचिन तेंडुलकरनं ३५० वनडे डावात हा पल्ला गाठला होता. त्याच्या पाठोपाठ या यादीत श्रीलंकेचा कुमार संगकारा आहे. त्याने ३७८ डावांत १४ हजार धावांपर्यंत मजल मारली होती.
कोहली अगदी सहज साधू शकेल वर्ल्ड रेकॉर्डचा डाव
विराट कोहली हा विक्रम मोडणार हे फिक्स आहे. पण त्यासाठी कोहली अजून किती सामने घेणार ते पाहण्याजोगे असेल. कोहलीनं २९५ वनडे सामन्यातील २८३ डावात १३९०६ धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. आणखी ९४ धावा करताच सर्वात जलद १४ हजार धावांचा टप्पा गाठण्याचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड तो प्रस्थापित करेल.