Join us

Indis vs England: 'त्या' कार्यक्रमामुळे रवी शास्त्रींच्या अडचणी वाढणार; बीसीसीआय ऍक्शन घेणार?

Indis vs England: भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमधील अनेकांना कोरोनाची लागण झाल्यानं पाचवा कसोटी सामना रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 22:27 IST

Open in App

लंडन: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षण आर. श्रीधर यांच्यापाठोपाठ फिजीयो नितीन पटेल यांना कोरोनाची लागण झाल्यानं पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर आता रवी शास्त्री यांच्या एका कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. लंडनमध्ये शास्त्री यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन झाल्याची बाब समोर आली आहे.भारत वि. इंग्लंड पाचवी कसोटी कधी होणार?; बीसीसीआय, ईसीबी तारीख ठरवणार

चौथ्या कसोटीपूर्वी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर रवी शास्त्री, भारत अरुण, आर. श्रीधर आणि नितीन पटेल यांना कोरोनाची लागण झाली. या सगळ्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. भारतीय संघाचे सहाय्यक फिजीयो योगेश परमारदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यानंतर भारतीय संघानं पाचवा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. 

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला कर्णधार विराट कोहली आणि संघातील इतर खेळाडूदेखील उपस्थित होते. या सोहळ्याला अनेक पाहुणे आले होते. ब्रिटनमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांत सूट असल्यानं कोणीही मास्क घातलेला नव्हता. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शास्त्री किंवा कोहलींनी बीसीसीआयची लेखी अनुमती घेतली नसल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. 'अध्यक्ष सौरव गांगुली किंवा सचिव जय शाह यांच्याकडून परवानगी घेण्यात आलेली नव्हती. ब्रिटनमध्ये सुरक्षा नियमांमध्ये सवलत देण्यात आली असल्यानं परवानगीची गरज नसावी असा विचार त्यांनी केला असावा,' असं बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं पीटीआयला सांगितलं.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीबीसीसीआयरवी शास्त्री
Open in App