इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत ऋषभ पंत जबरदस्त फॉर्मात दिसत आहे. पंतने पहिल्या कसोटी सामन्यात दोन शतके ठोकली होती. तर आता दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने अर्धशतक केले. या खेळीत त्याने 8 चौकार आणि तीन षटकार लगावले. याच बरोबर त्याने षटकारांचा महाविक्रम नोंदवला आहे. आता पंत परदेशी भूमीवर कसोटी सामन्यांत सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू बनला आहे. त्याने बेन स्टोक्स आणि मॅथ्यू हेडन सारख्या दिग्गजांनाही मागे टाकले.
परदेशी भूमीवर सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम -पंतने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात केवळ ५८ चेंडूत ६५ धावा ठोकल्या. या डावात पंतने ८ चौकार आणि तीन षटकार ठोकले. यासह, पंतने आतापर्यंत इंग्लंडमध्ये २४ षटकार ठोकले आहेत. हे परदेशी भूमीवर कोणत्याही फलंदाजाने ठोकलेले सर्वाधिक षटकार आहेत. पंतने या काळात स्टोक्सचा विक्रम मोडला. स्टोक्सने दक्षिण आफ्रिकेत २१ षटकार मारले आहेत. तर मॅथ्यू हेडनने भारतात १९ षटकार ठोकले आहेत.
गिलचाही पराक्रम, अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला -इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅमम कसोटी सामन्यातील पहिल्या डावात शुबमन गिलनं २६९ धावांची खेळी केली होती. त्यानंतर इंग्लंडच्या संघासमोर तगडे आव्हान सेट करण्यासाठी चौथ्या दिवसाच्या खेळातील दुसऱ्या डावात शुबमन गिलनं दमदार शतक झळकावले. सुनील गावसकर यांच्यानंतर एका कसोटी सामन्यात द्विशतकासह शतक झळकवणारा शुबमन गिल हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. गिलआधी लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात १२४ आणि दुसऱ्या डावात २२० धावांची खेळी केली होती.
भारताने दिलेय मोठे टार्गेट -- भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसरा डाव ६ बाद ४२७ धावांवर घोषित केला. पहिल्या डावातील १८० धावांच्या आघाडीसह टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांसमोर ६०८ धावांचे टार्गेट सेट केले आहे.