Ravi Shastri Jasprit Bumrah, IND vs ENG: टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका मुलाखतीदरम्यान अनेक खुलासे केले. रवी शास्त्री हे २०१७ ते २०२१ पर्यंत टीम इंडियाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. सध्या रवी शास्त्री समालोचनासाठी इंग्लंडमध्ये आहेत. तसेच, जसप्रीत बुमराहदेखील इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. याच दरम्यान, रवी शास्त्रींच्या एका मुलाखतीची क्लिप समोर आली आहे, ज्यामध्ये ते एका प्रश्नाच्या उत्तरात जसप्रीत बुमराहचे नाव घेत आहेत. स्टिक टू क्रिकेटने हा व्हिडिओ पोस्ट केला असून तो रवी शास्त्री यांनी रिपोस्ट केला आहे.
बुमराहबद्दल काय म्हणाले रवी शास्त्री?
रवी शास्त्री यांच्याशी रॅपिड फायर राऊंड खेळण्यात आली. त्यातील एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी बुमराहचे नाव घेतले. रवी शास्त्री यांना विचारण्यात आले की सध्याच्या क्रिकेटमधील कोणत्या गोलंदाजाचा सामना करायला तुम्हाला अजिबात आवडणार नाही? म्हणजेच, कोणत्या गोलंदाजासमोर फलंदाजी करणे तुम्ही टाळू इच्छिता? यावर क्षणार्धात रवी शास्त्री यांनी जसप्रीत बुमराहचे नाव घेतले. रवी शास्त्री यांनी बुमराहला खेळताना पाहिले आहे. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीची धार पाहूनच रवी शास्त्रींनी हे उत्तर दिले.
जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रभावशाली खेळाडू कोण?
रवी शास्त्री यांना आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज कोण, असे विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी विराट कोहलीचे नाव घेतले. शास्त्री म्हणाले की, विराट गेल्या दशकातील सर्वोत्तम खेळाडू तर आहेच, पण तो सर्वात प्रभावशाली क्रिकेटपटू देखील आहे.
आयुष्यातील सर्वोत्तम सल्ला...
रवी शास्त्री यांनी मुलाखतीदरम्यान त्यांना मिळालेल्या सर्वोत्तम सल्ल्याबद्दलही सांगितले. ते म्हणाले की, जेव्हा मी समालोचन करायला सुरुवात केली, तेव्हा मला मिळालेला सर्वोत्तम सल्ला रिची बेनॉ यांचा होता. रिची बेनॉ म्हणाले होते की, समालोचन करताना तुम्ही किती शब्द बोलता याचे पैसे मिळत नाहीत, तुम्ही काय बोलत आहात याचे पैसे मिळतात. शास्त्रींनी हा सल्ला कायम लक्षात ठेवला.