Join us  

विराटची माघार अन् त्यात IND vs ENG कसोटी मालिकेसाठी KL Rahul बाबत द्रविडचा मोठा निर्णय

भारत-इंग्लंड यांच्यातल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 1:51 PM

Open in App

IND vs ENG ( Marathi News ) : भारत-इंग्लंड यांच्यातल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. उभय संघांमध्ये पहिला कसोटी सामना हैदराबाद येथे खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या तीन दिवस आधी भारतीय संघाला व चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आणि ती म्हणजे स्टार फलंदाज विराट कोहली याची माघार... वैयक्तिक कारणास्तव विराटने पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतल्याचे निवेदन BCCI ने पोस्ट केले. त्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने यष्टिरक्षक-फलंदाज लोकेश राहुल ( KL Rahul) याच्याबाबत मोठा निर्णय जाहीर केला. 

रोहितच्या कसोटी कर्णधारपदावर जसप्रीत बुमराहची नजर? पॅट कमिन्सचं उदाहरण देऊन म्हणाला... 

इंग्लंड संघाला २०१२ पासून भारतीय भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. इंग्लंड संघाला १० वर्षांचा हा दुष्काळ संपवायचा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण १३१ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने ३१ सामने, इंग्लंडने ५० सामने जिंकले आहेत. ५० सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय खेळपट्टींमधील हेड टू हेड रेकॉर्डमध्ये भारताने ६४ पैकी २२ सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडला १४ कसोटी जिंकल्या आहेत. पण, यंदाची मालिका भारतासाठी खडतर म्हणावी लागेल.

विराटने माघार घेतल्याने भारताची फलंदाजीची फळी काहीशी कमकुवत नक्की होईल. रोहित शर्मा, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल यांच्यावर आघाडीची जबाबदारी असेल. विराटच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल व श्रेयस अय्यर हे मधली फळी सांभाळतील. अशात लोकेश राहुल यष्टिरक्षण करणार नसल्याचे राहुल द्रविडने स्पष्ट केले. ''कसोटी फॉरमॅट लक्षात घेता लोकेशवर अतिरिक्त ताण व्यवस्थापनाला द्यायचा नाही आणि तो या मालिकेत यष्टिरक्षण करणार नाही. आम्ही ही गोष्ट लक्षात ठेऊनच दोन अतिरिक्त यष्टिरक्षक-फलंदाज निवडले आहेत,''असे द्रविड म्हणाला.  

भारतीय संघात केएस भरत व ध्रुव जुरेल हे दोन यष्टिरक्षक आहेत. भरतने दोन दिवसांपूर्वी इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध नाबाद ११६ धावांची खेळी करून भारत अ संघाचा पराभव टाळला होता. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान पक्के आहे. 

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल,  श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर. जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स ( कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गुस एटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, झॅक क्रॅवली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टली, जॅक लिच, ऑली पोप, ऑल रॉबिन्सन, जो रूट, मार्क वूड 

IND vs ENG Test Series 

  • २५ ते २९ जानेवारी - हैदराबाद, सकाळी ९.३० वाजल्यापासून
  • ०२ ते ०६ फेब्रुवारी - विशाखापट्टणम, सकाळी ९.३० वाजल्यापासून
  • १५ ते १९ फेब्रुवारी - राजकोट, सकाळी ९.३० वाजल्यापासून
  • २३ ते २७ फेब्रुवारी - रांची, सकाळी ९.३० वाजल्यापासून
  • ७ ते ११ मार्च - धर्मशाला, सकाळी ९.३० वाजल्यापासून
टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडलोकेश राहुलराहुल द्रविडविराट कोहली