भारत-इंग्लंड यांच्यात मँचेस्टरच्या मैदानात रंगणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. दुसरीकडे मोहम्मद सिराज या सामन्यात बाकावर बसल्याचे दिसू शकते. चौथ्या कसोटी सामन्याआधी सहाय्यक कोच रयान टेन डोशेट यांनी सिराजच्या वर्कलोडवर भाष्य केल्यामुळे टीम इंडियात आगामी सामन्यात त्याला विश्रांती देण्याचा विचार करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सहाय्यक कोचनं सिराजच्या वर्कलोडवर केलं भाष्य
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सिराजच्या वर्कलोड संदर्भात टेन डोशेट म्हणाले आहेत की, सिराज हा नेहमीच अतिरिक्त षटके टाकण्यात आघाडीवर असतो. त्याच्या संदर्भातही वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार करणे देखील गरजेचे आहे. सिराजसारखा खेळाडू संघात असणे एक चांगली बाब आहे. बऱ्याचदा अपेक्षित आकडेवारी दिसत नसली तरी तो ज्या जिद्दीनं गोलंदाजी करतो, अशा शब्दांत त्यांनी सिराजचं कौतुक केलं आहे.
सिराजनं टाकली आहेत सर्वाधिक षटके
मोहम्मद सिराज हा सातत्याने भारतीय संघात आहे. २०२३ पासून आतापर्यंत सर्वाधिक षटके फेकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वलस्थानी आहे. कसोटीत आतापर्यंत त्याने जवळपास ५६९ एवढी षटके टाकली आहेत. या दरम्यान त्याने ६७ विकेट्स घेतल्या आहेत. मागील २७ कसोटी सामन्यात २४ सामन्यात तो मैदानात उतरला आहे.
सिराजच्या जागी कोण?
लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर भारतीय संघासाठी मँचेस्टर कसोटी सामना अधिक महत्त्वपूर्ण झालाय. जर या सामन्यात सिराजला विश्रांती दिली तर टीम इंडियात त्याच्या जागी कुणाला संधी मिळणार ते देखील पाहण्याजोगे असेल. जलदगती गोलंदाजाच्या जागी कुलदीप यादवची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाल्याचेही पाहायला मिळू शकते. टीम इंडियाने हा डाव खेळला तर जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांच्यासोबत नितीश कुमार रेड्डीवर जलदगती गोलंदाजीची मदार असेल. दुसऱ्या बाजूला कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा ही तिकडी इंग्लंडच्या फलंदाजांची फिरकी घेताना दिसू शकते.