Anaya Bangar Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगर हे नाव सध्या चर्चेत आहे. भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर हा लिंगबदल शस्त्रक्रिया करून मुलगी बनली. ती आता अनाया बांगर नावाने ओळखली जाते. अनाया जेव्हा आर्यन होती, तेव्हा ती यशस्वी जैस्वाल, सरफराज खान यासारख्या क्रिकेटपटूंसोबत क्रिकेट खेळली आहे. आता यशस्वी, सरफराज इंग्लंड दौऱ्यावर आहेत. २० जूनपासून टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध लीड्सच्या मैदानावर कसोटी मालिका खेळणार आहे. अनायाचे वडील संजय बांगर यांनीही लीड्सच्या मैदानावर अप्रतिम खेळी करून भारताला विजय मिळवून दिला होता. तो पराक्रम अद्यापही कोणाला जमलेला नाही.
लीड्समध्ये संजय बांगरची 'सुपर' कामगिरी
टीम इंडियाने हेडिंग्ले लीड्स येथे आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना फक्त २ सामने जिंकता आले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने २००२ मध्ये या मैदानावर शेवटचा सामना जिंकला होता, जेव्हा संजय बांगरने आपल्या खेळाने सर्वांचे मन जिंकले होते. या सामन्यात भारताने इंग्लंडला एक डाव आणि ४६ धावांनी हरवून शानदार विजय मिळवला होता. या विजयात संजय बांगरने बॅट आणि बॉलने पराक्रम केला होता.
भारताने मिळवला होता दमदार विजय
२००२ मध्ये मालिकेतील तिसऱ्या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना ६२८ धावांची मोठी धावसंख्या केली होती. या डावात सचिन तेंडुलकरने १९३ धावा, राहुल द्रविडने १४८ धावा आणि सौरव गांगुलीने १२८ धावा केल्या होत्या. पण संजय बांगरची भूमिका तितकीच महत्त्वाची होती. बांगरने पहिल्या डावात सलामीवीर म्हणून ६८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव २७३ तर दुसरा डाव ३०९ धावांवर संपला, ज्यामुळे भारताने सामना ४६ धावांनी जिंकला. या सामन्यात त्याने १३ षटके टाकून २ बळी घेतले होते.