India vs Englad, 5th Test : भारताने पाचव्या कसोटीत पकड घेतलेली दिसतेय. रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांच्यानंतर जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) फलंदाजीत वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवून इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याची झोप उडवली. त्यानंतर गोलंदाजीतही तीन धक्के दिले, पण पाऊस यजमानांच्या मदतीला धावून आला आहे. आता रात्री ९.५५ ला पुन्हा खेळपट्टीची पाहणी होईल आणि आजच्या दिवसाच्या खेळाबाबत निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत आज दिवसभराच्या खेळात काय घडले याचे हायलाईट्स पाहूया
रिषभ पंत ( १४६) व
रवींद्र जडेजा यांच्या वैयक्तिक शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात ४१६ धावांपर्यंत मजल मारली. जडेजा १९४ चेंडूंत १३ चौकारांसह १०४ धावांवर बाद झाला. ५ बाद ९८ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियाच्या मदतीला रिषभ व जडेजा ही जोडी धावून आली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी २२२ धावांची विक्रमी भागीदारी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवले. पण, खरी फटकेबाजी कर्णधार जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) केली. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या ( Stuart Broad) एका षटकात २९ धावा चोपल्या आणि कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. ब्रॉडच्या त्या षटकात एकूण ३५ धावा आल्या आणि कसोटी क्रिकेटमधील ते सर्वात महागडे षटक ठरले. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बुमराहने १६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३१ धावा केल्या.जेम्स अँडरसनने ६० धावा देताना ५ विकेट्स घेतल्या.
फलंदाजीत कमाल दाखवल्यानंतर कर्णधार जसप्रीतने गोलंदाजीने इंग्लंडचे धाबे दणाणून सोडले. त्याने तिसऱ्याच षटकात सलामीवीर अॅलेक्स लीजचा ( ६) त्रिफळा उडवला. त्यापाठोपाठ पाचव्या षटकात दुसरा ओपनर झॅक क्रॅवली ( ९) याला स्लिपमध्ये उभ्या असलेल्या शुबमन गिलकरवी झेलबाद केले. ऑली पोप ( १०) यालाही बाद करताना बुमराहने इंग्लंडची अवस्था ३ बाद ४४ अशी केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा इंग्लंडची विकेट पडली तेव्हा पाऊस त्यांना वाचवण्यासाठी धावून आला. थोडीशी विश्रांती घेत सतत पाऊस पडत होता आणि त्यामुळे खेळही थांबवावा लागत होता.