Ind Vs Eng test Match live : टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा निम्मा संघ ८४ धावांवर माघारी परतला होता. पण, तिसऱ्या दिवशी जॉनी बेअरस्टो व कर्णधार बेन स्टोक्स यांनी आक्रमक खेळ करताना अर्धशतकी भागीदारी केली. इंग्लंड सामन्यात पुनरागमन करतेय असे दिसत असताना विराट कोहलीतील ( Virat Kohli) आक्रमक खेळाडू जागा झाला आणि त्याने जॉनी बेअरस्टोसोबत स्लेजिंगला सुरुवात केली. पण, बेअरस्टोही गप्प बसण्यातला नव्हता, त्यानेही तोडीसतोड उत्तर दिले. याचे रुपांतर भांडणात झाले आणि Virat Kohli vs Jonny Bairstow असा राडा झाला.. 
रिषभ पंत ( १४६) व रवींद्र जडेजा ( १०४) यांच्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ४१६ धावांपर्यंत मजल मारली. रिषभ व जडेजा यांनी २२२ धावांची विक्रमी भागीदारी केली. जसप्रीत बुमराहने  १६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३१ धावा केल्या.जेम्स अँडरसनने ६० धावा देताना ५ विकेट्स घेतल्या. फलंदाजीत कमाल दाखवल्यानंतर कर्णधार जसप्रीतने गोलंदाजीने इंग्लंडचे धाबे दणाणून सोडले. त्याने दुसऱ्या दिवसअखेर तीन विकेट्स घेतल्या. अॅलेक्स लीज ( ६), झॅक क्रॅवली ( ९) व ऑली पोप ( १०) यांना बाद केले. त्यानंतर मोहम्मद सिराजने महत्त्वाची विकेट घेताना जो  रूटला ६७ चेंडूंत ३१ धावांवर बाद केले. मोहम्मद शमीने नाईट वॉचमन जॅक लिचला ( ०) माघारी पाठवले आणि इंग्लंडच्या दिवसअखेर ५ बाद ८४ धावा झाल्या होत्या. 
![]()
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा  स्टोक्स व बेअरस्टो यांनी आक्रमक सुरूवात केली. सूर्याच्या लख्ख प्रकाशामुळे खेळपट्टीही त्यांना मदत करत होती. या दोघांनी आतापर्यंत सहाव्या विकेटसाठी ६८ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी करून इंग्लंडला ५ बाद १४६ धावांपर्यंत नेले आहे.  १८ धावांवर असताना स्टोक्सचा उत्तुंग उडालेला झेल शार्दूल ठाकूरने टाकला. दरम्यान, विराट व बेअरस्टो यांच्यात वाद रंगला. बेअरस्टोने ८१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.