Ind Vs Eng test Match live : बिनबाद १०७ वरून इंग्लंडची अवस्था ३ बाद १०९ झाली अन् टीम इंडियाने कमबॅकच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. पण, कसोटीतील नंबर वन फलंदाज जो रूट ( Joe Root) व भन्नाट फॉर्मात असलेल्या जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांनी दमदार खेळ करताना टीम इंडियाच्या हातून सामना खेचून आणला. झॅक क्रॅवली व अॅलेक्स लीज यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी करून दमदार सुरूवात करून दिली होती. पण, नव्या चेंडूने जसप्रीत बुमराहने दोन विकेट्स घेत भारताला कमबॅक करून दिले. मात्र, चुकीचे DRS अन् क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांमुळे भारताने सामन्यावरील पकड गमावली. रूट व बेअरस्टो यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून इंग्लंडला पुन्हा फ्रंट सीटवर बसवले आहे.
३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झॅक क्रॅवली व अॅलेक्स लीज यांनी शतकी भागीदारी करून भारतीय संघाची धाकधुक वाढवली. पण, अनेकांना २०२१मध्ये झालेल्या चौथ्या कसोटीतील चमत्काराची आठवण झाली. तेव्हाही बिनबाद १०० धावांवरून इंग्लंडचा डाव २१० धावांवर संपुष्टात आला होता. लीज ५६ व क्रॅवली ४६ धावांवर बाद झाल्यानंतर ओली पोपही भोपळ्यावर बाद झाला अन् भारतीयांना विजयाचे स्वप्न पडू लागले. पण, जो रूट व जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडचा डाव सावरला.
रुट नेहमीपेक्षा आज अधिक वेगाने धावा करताना दिसला. रूटने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक २४३२* धावा करणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूचा मान पटकावताना अॅलिस्टर कूकला ( २४३१) मागे टाकले. रूट व बेअरस्टो यांची विकेट मिळवण्यासाठी भारताने दोन DRS ही वाया घालवले. इंग्लंडची ही अनुभवी जोडी सहज धावा जमवत होत्या आणि भारताचे क्षेत्ररक्षण पाहून त्यांच्याकडून धावा अडवण्याचेही प्रयत्न झालेले दिसले नाही. रुटने ७१ चेंडूंत कसोटीतील ५५ वे अर्धशतक पूर्ण केले. कसोटीतील नंबर १ फलंदाज रूटने भारतीय गोलंदाजांना हतबल केले होते. रूट व बेअरस्टोने शतकी भागीदारी केली. बेअरस्टोनेही ७५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
या दोघांनी १९७ चेंडूंत १५०+ धावांची भागीदारी केली. बेअऱस्टो ८९ चेंडूंत ७३ धावांवर, तर रूट ११० चेंडूंत ७६ धावांवर नाबाद आहे. इंग्लंडने दिवसअखेर ३ बाद २६० धावा केल्या असून त्यांना विजयासाठी ११८ धावा हव्या आहेत. भारताला अखेरच्या दिवशी ७ विकेट्स घ्यायच्या आहेत.