IND vs ENG 5th Test, Jasprit Bumrah Miss Oval Test Against England : भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील पाचवा आणि अखेरचा सामना लंडन येथील ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी जसप्रीत बुमराह तंदुरुस्त असून सामन्याच्या दिवशी कर्णधार शुबमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर त्याला खेळवायचं की, नाही यासंदर्भात निर्णय घेतील, असे म्हटले होते. पण यासंदर्भात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. भारतीय संघ महत्त्वपूर्ण कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहशिवायच मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. मग आता पाचव्या कसोटी सामन्यात त्याच्या जागी कुणाला संधी मिळेल? असा प्रश्न निर्माण होतो. जाणून घेऊयात यासंदर्भात सविस्तर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुमराह ठरल्याप्रमाणे ३ सामने खेळल्यानंतर विश्रांती घेणार
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, बीसीसीआय मेडिकल टीम आणि संघ व्यवस्थापनाने बुमराहच्या पाठीच्या दुखापतीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख जलदगती गोलंदाजाच्या वर्कलोड मॅनेजमेंटसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. इंग्लंड दौऱ्यावरील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो फक्त ३ सामन्यातच मैदानात उतरणार हे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. दीर्घकालीन विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून त्यात कोणताही बदल होणार नाही. जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्ध पहिला, तिसरा आणि दुसरा कसोटी सामना खेळला आहे. त्यामुळे पाचव्या कसोटी सामन्यात त्याला विश्रांती देण्यात येईल. चौथ्या कसोटी सामन्यात ३३ षटके गोलंदाजी करताना त्याने २ विकेट्स घेतल्या होत्या. ३ सामन्यात त्याच्या खात्यात १४ विकेट्स जमा आहेत.
बुमराहच्या जागी कुणाला मिळणार संधी?
एजबेस्टन कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहच्या जागी आकाश दीप संघात येणार की, अर्शदीप सिंगला पदार्पणाची संधी मिळणार हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. एजबॅस्टन कसोटीत आकाशदीप याला बुमराहच्या जागी संघात स्थान देण्यात आले होते. बुमराहच्या कमबॅकनंतरही तो संघात कायम राहिला. पण पाठीच्या दुखापतीमुळे चौथ्या कसोटी सामन्यात तो दिसला नाही. आता त्याला पुन्हा टीम इंडियात कमबॅकची संधी मिळू शकते. बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन कसोटीत या पठ्ठ्यानं १० विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
अर्शदीप सिंगची पदार्पणाची प्रतिक्षा संपणार?
बुमराहच्या जागी आकाशदीपला संधी मिळाली तरी अर्शदीप सिंगला पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळू शकते. अंशुल कंबोज याच्या जाग्यावर त्याच्यावर डाव खेळला जाऊ शकतो.