Join us

IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा

केएल राहुलसह साई सुदर्शन स्वस्तात परतला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 00:35 IST

Open in App

IND vs ENG 5th Test Day 2, Stumps :  लंडन येथील ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात गोलंदाजांचा कहर पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारतीय संघाने दुसऱ्या डावाची सुरुवात केल्यावर २ विकेट्स गमावल्या आहेत. सलामीवीर लोकेश राहुल ७ (२८) आणि साई सुदर्शन ११ (२९) तंबूत परतल्यावर यशस्वी जैस्वालच्या भात्यातून आलेल्या नाबाद अर्धशतकामुळे टीम इंडियाला मोठा दिलासा मिळालाय.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

यशस्वी जैस्वालची अर्धशतकी खेळी

दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी भारतीय संघाने ७५ धावा करत  इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात घेतलेली २३ धावांची अल्प आघाडी भेदत ५२ धावांची आघाडी मिळवली. यशस्वी जैस्वाल ४९ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ५१ धावांवर नाबाद खेळत होता. दुसऱ्या बाजूला नाईट वॉचमनच्या रुपात आलेल्या आकाशदीपनं २ चेंडूचा सामना करत एका चौकाराच्या मदतीने ४ धावा केल्या होत्या.

IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स

ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात ही भारतीय संघाच्या पहिल्या डावानं झाली. करुण नायर आणि वॉशिंग्टन सुंदर जोडीनं २०४ धावांवरुन खेळाला सुरुवात केली. पण अवघ्या २० धावांत संघाने ४ विकेट्स गमावल्या. परिणामी भारतीय संघाचा पहिला डाव २२४ धावांवर आटोपला. इंग्लंड भारताचा  टीम इंडिया इंग्लंडच्या संघाने आपल्या पहिल्या डावात ९ विकेट्स गमावल्या. 

सलामीवीरांची भक्कम भागीदारी, मग कोलमडली इंग्लंडची फलंदाजी

इंग्लंडच्या संघाने आपल्या पहिल्या डावाची सुरुवात दमदार केली. सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. पण आकाशदीपनं ही जोडी फोडली अन् त्यानंतर मोहम्मद सिराज अन् प्रसिद्ध कृष्णाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडची फलंदाजी कोलमडून पडली. भारताच्या दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी ४-४ विकेट्स घेत भारतीय संघाला जबरदस्त कमबॅक करून दिले. आकाश दीपनं एक विकेट घेतली. क्रिस वोक्स दुखापतग्रस्त असल्यामुळे ९ विकेट्स पडल्यावर इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर आटोपला.

दुसऱ्या दिवसाच्या खेळात एकूण १५ विकेट्स

इंग्लंडचा पहिला डाव आटोपल्यावर भारतीय सलामी जोडीनं चांगली सुरुवात केली. पण धावफलकावर ४६ धावा असताना जॉश टंगनं लोकेश राहुलला आपल्या जाळ्यात अडकवले. तो जो रुटच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. पहिल्या डावात 'पंजा' मारणाऱ्या गस ॲटकिन्सन याने साई सुदर्शनला चालेत करत टीम इंडियाला दुसरा धक्का दिला. दुसऱ्या डावातील या दोन विकेट्स अन् दुसऱ्या दिवसाच्या खेळातील पहिल्या डावातील ४ विकेट्स अशा टीम इंडियाने गमावलेल्या ६ विकेट्स आणि इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावतील ९ विकेट्स मिळून दिवसभराच्या खेळात १५ विकेट्स पडल्याचे पाहायला मिळाले. तिसऱ्या दिवसाच्या खेळातही फलंदाजांची कसोटी असून टीम इंडिया मालिका वाचवण्यासाठी इंग्लंडसमोर किती धावांचे आव्हान सेट करणार ते पाहण्याजोगे असेल.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडयशस्वी जैस्वाललोकेश राहुलमोहम्मद सिराज