Join us

Day For Thorpey : इंग्लिश खेळाडू खास 'हेडबँड'सह उतरले मैदानात; जाणून घ्या त्यामागचं कारण

इंग्लंडच्या ताफ्यातील सर्व खेळाडू पांढऱ्या रंगाचा खास लोगो असलेला हेडबँड बांधून दिसले. इथं जाणून घेऊया यामागची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:57 IST

Open in App

IND vs ENG 5th Test Day 2 Graham Thorpe :  इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत अखेरचा सामना लंडन येथील ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लिश समालोचक अन् चाहत्यांसह इंग्लंडच्या ताफ्यातील सर्व खेळाडू पांढऱ्या रंगाचा खास लोगो असलेला हेडबँड बांधून दिसले. इथं जाणून घेऊया त्यामागचं कारण...   

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

या दिग्गजाच्या सन्मानार्थ 'हेडब्रँड'सह मैदानात उतरले खेळाडू

इंग्लंडचे दिग्गज आणि दिवंगत क्रिकेटपटू ग्राहम थॉर्प यांच्या सन्मानार्थ त्यांच्या ५६ व्या बर्थडेच्या दिवशी खास उपक्रम राबवण्यात आला. हा क्रिकेटर आपल्या कारकिर्दीत डोक्याला पांढरी पट्टी बांधून मैदानात उतरायचा. त्यामुळेच इंग्लंडच्या संघाकडून मैदानात उतरणाऱ्या जो रुटसह अन्य खेळाडूंसह बाकावर बसून असलेल्या बेन स्टोक्ससह सर्व खेळाडूंनी  'हेडबँड'ला पसंती दिली. गतवर्षी ५५ वा वाढदिवस साजरा केल्यावर इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटरनं नैराश्य अन् चिंतेच्या समस्येचा दिर्घकालीन संघर्षातून मुक्त होण्यासाठी स्वत:च आयुष्य संपवलं होते. 

IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?

१०० कसोटी सामने खेळणाऱ्या मोजक्या इंग्लिश क्रिकेटरपैकी एक

ग्राहम थॉर्प हे इंग्लंडकडून शंभर कसोटी सामने खेळणाऱ्या मोजक्या १७ क्रिकेटर्सपैकी एक होते. त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत १०० कसोटी सामन्यात ४४.६६ च्या सरासरीसह त्यांच्या खात्यात ६,७४४ कसोटी धावांची नोंद आहे. इंग्लंडच्या या दिग्गजाने सरे, इंग्लंड आणि अफगाणिस्तानच्या संघाच्या प्रशिक्षकपदाची भूमिकाही बजावली होती.

 ग्राहम थॉर्प यांच्या हेडब्रँडसह कुटुंबियांचा खास संकल्प

दिग्गज क्रिकेटरच्या निधनानंतर पत्नी अमांडा आणि मुलगी किट्टी आणि एम्मा यांनी मानसिक आरोग्य धर्मादाय संस्थेसाठी पैसे उभारण्याचा उपक्रम सुरु केला आहे. याच उपक्रमाअंतर्गत १ ऑगस्ट रोजी  द ओव्हलच्या मैदानातील कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 'अ डे फॉर थॉर्पी' साजरा करण्यात आला. खेळाडूंशिवाय सामना पाहण्यासाठी उपस्थितीत चाहत्यांसह समालोचकांनीही डोक्याला हेडबँड बांधल्याचे दिसून आले. ग्राहम थॉर्प यांच्या खास हेडब्रँडची विक्री करून त्यातून जमा होणारा निधी हा मानसिक आरोग्याच्या समस्येनं त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थेला दिला जाणार आहे.    

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडबेन स्टोक्सजो रूटऑफ द फिल्ड